दिव्यांग अनूने वर्गमित्रांना दिमाखात दाखविला नवा पाय
By admin | Published: May 6, 2017 01:02 AM2017-05-06T01:02:42+5:302017-05-06T01:02:42+5:30
बर्मिंगहॅम येथे जन्मलेली भारतीय वंशाची अनू सात वर्षांची आहे. इतर मुलांप्रमाणेच तिलाही खेळण्याची आवड आहे
बर्मिंगहॅम येथे जन्मलेली भारतीय वंशाची अनू सात वर्षांची आहे. इतर मुलांप्रमाणेच तिलाही खेळण्याची आवड आहे; मात्र एका पायाने अधू असल्यामुळे अनूला खेळता येत नव्हते. इतरांना खेळताना पाहून ती समाधान मानून घेई. सरकारी योजनेतून स्पोर्टस् प्रोस्थेटिक ब्लेड (एक प्रकारचा कृत्रिम पाय) मिळाल्यामुळे अनूचे सवंगड्यांसोबत खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनूचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तिच्या उजव्या पायात समस्या होती. इन्फेक्शन होऊ नये म्हणून तो पाय कापून टाकण्यात आला. अनू दररोज कृत्रिम पाय घालून शाळेला जाते. तिला खेळण्याची खूप आवड असूनही स्पोर्टस् प्रोस्थेटिक ब्लेड (एक प्रकारचा कृत्रिम पाय) नसल्यामुळे तिला मन मारावे लागत होते. तिने बीबीसीला सांगितले की, मला एक पाय नाही. तरीही मला जे हवे ते मी करते. मी दररोज पापांसोबत फुटबॉल खेळते. अनु स्पोर्टस् प्रोस्थेटिक ब्लेड घालून शाळेच्या मैदानात उतरली तेव्हा वर्गमैत्रिणींनी तिला चिडविण्याऐवजी मिठी मारून पाठिंबा दर्शविला. हे दृश्य खूपच भावनिक होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, तो मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. वर्गमित्र आणि मैत्रिणींनी अनूचे अत्यंत प्रेमाने मैदानात स्वागत केले. अनूनेही अगदी नव्या ड्रेसप्रमाणे आपला नवा पाय मोठ्या दिमाखात वर्गमित्र-मैत्रिणींना दाखविला. यावेळी काही मुलांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले, तर काहींनी अनूला प्रोत्साहन दिले. त्यानंतर अनू इतर मुलांप्रमाणे खेळू लागली.