चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 02:40 PM2024-12-03T14:40:52+5:302024-12-03T14:41:50+5:30

New Human Species China : या प्रजातीच्या आताच्या मानवाशी काही संबंध आहे का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत.

New human species found in China; Where exactly did big-headed humans come from? | चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून?

चीनमध्ये आढळली मानवाची नवीन प्रजाती; मोठ्या डोक्याचे हे मानव नेमकं आले कुठून?

New Human Species China : मानवाची उत्क्रांती होण्यासाठी लाखो वर्षे लागली. माकडापासून सुरू झालेली मानव जात आज अतिशय प्रगत टप्प्यात आहे. दरम्यान, आजही जगभरातील अनेक ठिकाणी अश्मयुगीन मानवाचे अवशेष सापडतात. या अवशेषातून आपल्याला त्या काळातील मानवाची शरीरचना आणि त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळते. विशेष म्हणजे, आता चीनमध्ये मानवाची एक नवीन प्रजाती सापडली आहे. ही प्रजाती चीनमध्ये 3 लाख ते 50 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असल्याचा अंदाज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, या प्रजातीमधील मानवाचं डोकं खूप मोठं होतं. आपले पूर्वज होमो सेपियन्स असल्याचं मानलं जातं, पण चीनमध्ये सापडलेले अवशेष यापेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे ही नवीन प्रजाती कुठून आली, याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. 

या मानवाचा आपल्याशी काही संबंध आहे का?
चीनमध्ये मोठं डोकं असलेल्या मानवांची एक नवीन प्रजाती सापडली आहे. या प्रजातीचं नाव Homo Juluensis, म्हणजेच मोठं डोकं आहे. ही प्रजाती चीनमध्ये 3 लाख ते 50 हजार वर्षांपासून अस्तित्वात होती. आपण होमो सेपियन्सपासून उत्क्रांत झालो आहोत, जे सुमारे 3 लाख वर्षांपूर्वी विकसित झाले. आफ्रिका, युरोप आणि आशियामध्ये वेगाने पसरले. पण चीनमध्ये आढळलेली प्रजाती नेमकी कुठून आली? याचे उत्तर शास्रज्ञ शोधत आहेत. 

हे होमिनिन्स (Homonins) आधुनिक मानवाच्या आगमनापूर्वीचे आहेत का? असा प्रश्नही उपस्थित होतोय. यांचे अस्तित्व 7 ते 3 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर असण्याचा अंदाज आहे. सूमारे चार लाख वर्षे त्यांचे पृथ्वीवर अस्थित्व असू शकते. विशेष म्हणजे, मानवाची नवीन प्रजाती सापडल्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही जगाच्या कानाकोपऱ्यात मानवाच्या विविध प्रजाती अस्तित्वात होत्या. युरोपमधील होमो हाइडेलबर्गेन्सिस आणि मध्य चीनमधील होमो लाँगी प्रमाणे, हीदेखील प्रगत मानवाची प्रजाती असण्याची शक्यता आहे. आता त्यांचा सकोल अभ्यास करुनच शास्त्रज्ञ एखाद्या निष्कर्षावर येतील. 

होमो सेपियन्सशी संबंध
चीनमध्ये सापडलेल्या प्रजातीला शास्त्रज्ञांनी पुरातन होमो सेपियन्स किंवा मध्य प्लेस्टोसीन होमो देखील म्हटले आहे. म्हणजे एकंदरीत ही प्रजाती मध्यम काळातील असण्याचा अंदाज आहे. हवाई विद्यापीठातील मानववंशशास्त्रज्ञ क्रिस्टोफर बे आणि चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हर्टेब्रेटचे जीवाश्मशास्त्रज्ञ झिउजी वू यांनी मानवाच्या या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. नुकताच त्यांचा अभ्यास या वर्षीच्या पॅलिओअँथ्रोपोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

Web Title: New human species found in China; Where exactly did big-headed humans come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.