बोंबला! कोरोना व्हायरसच्या दहशतीत खोकणंही गुन्हा; एकाविरोधात दहशतवादाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:08 PM2020-03-25T12:08:17+5:302020-03-25T12:09:17+5:30
कोरोना व्हायरसची दहशत इतकी पसरली आहे की, लोकांच्या मनात भयंकर भीती आहे. अशात खोकणंही गुन्हा झाला आहे.
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमध्ये इतकी भीती पसरली आहे की, खोकणंही गुन्हा झाला आहे. सुपरमार्केटमधील एका कर्मचाऱ्यावर खोकल्याने एका व्यक्तीवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेतील न्यूजर्सीतील एका व्यक्तीवर यासाठी दहशतवादाचं कलम लावलं कारण तो सुपरमार्केटमधील एका कर्मचाऱ्याजवळ खोकला. खोकल्यानंतर त्याने सांगितले की, तो कोरोना व्हायरसने संक्रमित आहे. त्यानंतर न्यूजर्सीतील प्रशासनाने त्याच्यावर दहशतवादाचा गुन्हा दाखल केला.
न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, 50 वर्षाच्या जॉर्ज फाल्कनवर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच त्याच्यावर आणखीही काही चार्जेस लावण्यात आले आहेत. न्यूजर्सीच्या अटार्नी जनरल कार्यालयाने या वृत्ताला दुरोजा दिला आहे.
अमेरिकेत खोकणं झाला गुन्हा
दरम्यान रॉयटरने याबाबत फाल्कनला विचारले असता त्याने फेसबुक मेसेजच्या माध्यमातून त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप नाकारले आहेत. त्याने सांगितले की, तो कुणावरही खोकला नाही आणि तो कोरोनाबाबत काही बोलला सुद्धा नाही.
तर दुसरीकडे न्यूजर्सी अटार्नी जनरल ग्रेवाल यांच्या हवाल्याने सांगितले जात आहे की, जॉर्ज फाल्कन वेगमॅसच्या सुपरमार्केटमध्ये गेला होता. रविवारी सायंकाळी तो सुपरमार्केटमध्ये जाऊन खाण्या-पिण्याच्या वस्तूंजवळ उभा होता. सुपरमार्केटमधील कर्मचाऱ्याने त्याला बाजूला उभं राहण्यास सांगितले. पण तो त्या कर्मचाऱ्याजवळ गेला आणि त्याच्यावर खोकला. त्यानंतर हसत तो बोलला की, त्याला कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन झालं आहे.
त्यानंतर फाल्कन सुपरमार्केटमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांजवळ गेला आणि त्यांना बोलला की, तुम्ही नशीबवान आहात, तुमच्याकडे नोकरी आहे. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या घटनेबाबत त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने ओळख सांगण्यास नकार दिला होता.
मंगळवारी न्यूजर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी जॉर्जवर लावण्यात आलेल्या दहशतवादाच्या गुन्हाबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले की, हा फारच खोडकरपणा आहे. कायद्याचं पालन केलं जावं आणि व्हायरसला गंभीरतेने घेण्यासाठी एजन्सीजना कठोर पावले उचलावे लागतात.