नोटा तयार करण्यासाठी कागदाचा जराही होत नाही वापर, जाणून घ्या कशापासून तयार होतात....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:25 PM2021-12-15T17:25:19+5:302021-12-15T17:25:33+5:30
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कधी कधी नोटा आपल्याकडून भिजतात. त्यानंतर त्या खराब होत नाहीत आणि आपण त्या पुन्हा वापरू शकतो.
सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत जर कोणत्या गोष्टीमुळे आपलं जीवन चालत असेल तर ती गोष्ट आहे पैसे. पैशांशिवाय जीवन जगणं अवघडच नाही तर अशक्य आहे. काही खरेदी करायचं असेल, कुठे जायचं असेल किंवा कोणतंही काम करायचं असेल तर त्यासाठी पैसा लागतो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कधी कधी नोटा आपल्याकडून भिजतात. त्यानंतर त्या खराब होत नाहीत आणि आपण त्या पुन्हा वापरू शकतो.
नोटा बनवण्यासाठी कागद वापरत नाहीत
बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, नोटा तयार करण्यासाठी कागदाचा अजिबात वापर केला जात नाही. जास्तीत जास्त लोकांना वाटतं की, नोटा कागदापासून तयार होतात. पण समज पूर्णपणे चुकीचा आहे. नोटा तयार करण्यासाठी कागदाचा नाही तर कापसाचा वापर केला जातो. कागदाचा वापर केला तर नोटा जास्त काळ टिकणार नाहीत आणि लवकर फाटतील. तेच कापसाचा वापर केला तर नोटा जास्त काळ टिकतात. त्यामुळे नोटा तयार करताना शंभर टक्के कापसाचाच वापर केला जातो.
जगभरातील नोटांमध्ये कापसाचा वापर
त्यासोबतच कागदाच्या नोटेच्या तुलनेत कापसाची नोटा जास्त मजबूत असते. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर केला जातो. कापसाच्या धाग्यांमध्ये लेनिन नावाचं एक फायबर असतं. जेव्हा नोटा तयार केल्या जातात तेव्हा कापसाशिवाय आधेसिवेस सोलुशन किंवा गॅटलिनचा वापर केला जातो. याने नोटांचं वय वाढतं.
RBI ला नोटा जारी करण्याचा अधिकार
आपल्या देशात नोटा जारी करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ RBI ला आहे. भारतात तयार होणाऱ्या नोटांमध्ये काही सिक्युरिटी फिचर्सही असतात. फसवणूक रोखण्यासाठी हे सिक्युरिटी फिचर्स असतात.