अजब तुझे सरकार; आईने मुलांना आगीतून वाचवलं, पोलिसांनी तिलाच तुरुंगात टाकलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:29 PM2020-01-10T12:29:35+5:302020-01-10T12:34:50+5:30
जगातला एक असा देश ज्याची नेहमीच तेथील विचित्र कायद्यांमुळे चर्चा होत असते. येथील सर्वोच्च नेता म्हणजे किम जोंग उन हा आहे.
जगातला एक असा देश ज्याची नेहमीच तेथील विचित्र कायद्यांमुळे चर्चा होत असते. येथील सर्वोच्च नेता म्हणजे किम जोंग उन हा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या देशात कायद्याच्या नावावर काहीही केलं जातं. आता हेच बघा ना एका महिलेला तुरूंगात पाठवण्यात आलं. कारण काय तर तिच्या घरात आग लागली होती आणि तिने तिच्या मुलांचा जीव वाचवला. मात्र, तिने घरातील भिंतीवरील किम जोंगचा फोटो आगीतून बाहेर काढला नाही.
मुळात यावर तुमचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. पण ही घटना खरी आहे. या महिलेसाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी ही केस हाताळत आहेत. डेल मेलने दिलेल्या एका वृत्तानुसार, ही घटना चीनच्या सीमेजवळील उत्तर हेमग्यों प्रांतातील ऑनसॉन्ग काउंटीमध्ये घडली. येथील एका घरात दोन परिवार एकत्र राहत होते. आग लागली तेव्हा घरात मुले एकटी होती. अशात पालकांनी मुलांना वाचवण्यासाठी आगीत झेप घेतली. याच आगीत घरातील भिंतीवरील किम जोंग आणि त्यांच्या परिवारातील काही सदस्यांचे फोटो होते. ते जळून राख झालेत.
उत्तर कोरियातील लोकांना हे सांगितलं जातं की, त्यांना घरात नेत्यांचे फोटो लावावेत. महिलेच्या घरात किम इल-संग आणि किम जोंग-इल यांचे फोटो होते. घरात चौकशी आणि तपासासाठी पोलीस पाठवण्यात आले होते. लोकांकडून अशी अपेक्षा केली जाते की, त्यांनी हे फोटो तर लावावेच सोबतच त्यांना मनुष्यांप्रमाणे महत्वही द्यावं. या फोटोंचा अपमान तिथे अपराध मानला जातो.
दरम्यान जर ही महिला यात दोषी आढळली तर तिला मोठ्या काळासाठी तुरूंगात जावं लागू शकतं. जोपर्यंत ही चौकशी चालणार तोपर्यंत ही महिला तुरूंगातच राहणार आहे. आगीत जखमी झालेल्या महिलेच्या मुलांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पण ही आई आता इच्छा होऊनही आपल्या मुलांना भेटू शकणार नाही.