पाण्याचे नळ सुरू करताच ४० घरांमध्ये यायची देशी दारू; तक्रारीनंतर उघडकीस आला भलताच प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 12:55 PM2021-09-08T12:55:53+5:302021-09-08T12:56:49+5:30

पाण्याच्या नळांतून देशी दारू येत असल्याची तक्रार; पोलीस तपासातून वेगळीच माहिती समोर

Not liquor sewage sullied tap water in Sarkhej gujarat | पाण्याचे नळ सुरू करताच ४० घरांमध्ये यायची देशी दारू; तक्रारीनंतर उघडकीस आला भलताच प्रकार

पाण्याचे नळ सुरू करताच ४० घरांमध्ये यायची देशी दारू; तक्रारीनंतर उघडकीस आला भलताच प्रकार

googlenewsNext

अहमदाबाद: घरातील पाण्याचे नळ सुरू करताच त्यातून देशी दारू येत असल्याची तक्रार गुजरातच्या अहमदाबादमध्ये काही जणांनी केली. सारखेज भागात असलेल्या ४० घरांमध्ये पाण्याच्या नळातून दारू येत असल्याचा स्थानिकांचा दावा होता. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पाण्याचे नमुने फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आले. त्या चाचणीच्या अहवालातून वेगळाच प्रकार समोर आला. 

'घरात असलेल्या नळांमधून देशी दारू येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला. नागरिकांच्या तक्रारी आल्यानं आम्ही या प्रकरणाचा तपास केला. नळातून येणाऱ्या पाण्याचे नमुने घेऊन फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल नुकताच हाती आला. मात्र त्यात दारूचा कोणताही उल्लेख नाही. पाण्यामध्ये मलपदार्थ आणि ई कोली नावाचा बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. हा बॅक्टेरिया आपल्या आतड्यांमध्ये असतो', अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

प्रेमाचं 'नेटवर्क' लई स्ट्राँग बुवा! फेरीवाल्याचं इंजिनिअर मुलीवर जडलं प्रेम, मग पुढं काय घडलं तुम्हीच पाहा...

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र हा विषय महापालिकेशी संबंधित असल्यानं त्यांनी तक्रार दाखल केलेली नाही. माणसांच्या आरोग्याला धोका पोहोचवणारी कृती केल्याबद्दल गुन्हा का नोंदवण्यात आला नाही, असा प्रश्न पोलिसांना विचारण्यात आला. त्यावर ही कृती जाणूनबुजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका पोहोचवल्याचा गुन्हा या प्रकरणात दाखल करण्यात आलेला नाही. महापालिकेचे कर्मचारी गटार दुरुस्त करत असताना त्यातील अस्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये शिरलं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याच्या नळातून देशी दारू येत असल्याची तक्रार सारखेजमधील ४० घरांमधील लोकांनी केली होती. गेल्या गुरुवारी स्थानिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परिसरात असलेल्या काही घरांमध्ये देशी दारू तयार करण्याचं काम चालतं. तिथले लोक नको असलेली दारू पाण्यात सोडतात. ती पिण्याच्या पाण्याच्या पाईपमध्ये शिरत असल्याचा स्थानिकांचा दावा होता.

Web Title: Not liquor sewage sullied tap water in Sarkhej gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.