आता तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र!
By Admin | Published: May 6, 2015 10:17 PM2015-05-06T22:17:59+5:302015-05-06T22:17:59+5:30
शेंगेतून काढलेले तयार तुरीचे हिरवे दाणे मिळाले तर या उद्योगाला चांगली चालना मिळेल, या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे.
राजरत्न सिरसाट, अकोेला
तुरीच्या डाळीपेक्षा हिरव्या दाण्यांमध्ये अधिक जीवनसत्त्व असल्याने, अलीकडे या हिरव्या शेंगांना बाजारात मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात हिरव्या शेंगा विक्रीस येण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांना जर शेंगेतून काढलेले तयार तुरीचे हिरवे दाणे मिळाले तर या उद्योगाला चांगली चालना मिळेल, या उद्देशाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीच्या शेंगेतून हिरवे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे. हे या देशातील पहिलेच यंत्र असल्याचा दावा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केला आहे.
भारतात तूर या डाळवर्गीय पिकाचे सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे. मागील वर्षी पावसाला विलंब झाल्याने देशात ८३.२४ लाख हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. हे पीक मुख्यत: कोरडवाहू क्षेत्रात घेतले जाते. तुरीच्या डाळीत जीवनसत्त्वाची मात्रा इतर डाळींपेक्षा अधिक असल्याने देशात तूर डाळ उत्पादनावर अधिक भर दिला जात आहे, पण अलीकडे ग्राहकांचा ओढा हा तुरीच्या डाळीऐवजी हिरव्या शेंगांकडे वाढला आहे. म्हणूनच तुरीच्या या हिरव्या शेंगेचे दर बाजारात प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तुरीच्या हिरव्या दाण्यांमध्ये वाळेलल्या डाळीपेक्षा जीवनसत्त्व (प्रोटिन्स) अधिक प्रमाणात असल्याने ग्राहक हिरव्या शेंगेची मागणी करीत आहेत. या हिरव्या दाण्यांमध्ये प्रोटिन्स तर अधिक आहेतच, शिवाय या दाण्यांची भाजी रुचकर आणि स्वादिष्ट बनते. विशेष म्हणजे, या हिरव्या तुरीची भाजी खाल्ल्याने आम्लपित्ताचा त्रास जाणवत नाही. त्यामुळेही हिरव्या शेंगेला मागणी वाढतीच आहे. त्याच पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तुरीचे कोवळे दाणे काढणारे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राची ताशी २५ किलो हिरव्या शेंगांतून दाणे काढण्याची क्षमता आहे. या यंत्राच्या चाळणीत थोडा बदल केल्यास यातून वाटाण्याच्या शेंगादेखील सोलल्या जातात. एक ते दोन वर्षाच्या संशोधनाअंती कृषी विद्यापीठाच्या कापणीपश्चात संशोधन, तंत्रज्ञान विभागाने हे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राला राज्यस्तरीय संशोधन व आढावा समितीसमोर मांडण्यात येणार आहे.
-------
आंतरराष्ट्रीय पातळीवर अद्याप तुरीच्या हिरव्या शेंगांतून दाणे काढणारे यंत्र विकसित झाले नाही. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांची गरज बघून या यंत्राचा विकास केला आहे.
- डॉ. प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता तथा विभागप्रमुख, कापणीपश्चात संशोधन, तंत्रज्ञान विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.