आता घरोघरी गुरुत्वाकर्षणाची ‘फुकट’ वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2022 10:09 AM2022-06-07T10:09:12+5:302022-06-07T10:09:24+5:30

electricity : या यंत्रणेतील एखादा भाग निकामी झाला तर सगळी यंत्रणा बदलण्याची गरज नसून तेवढा निकामी झालेला भाग बदलता येऊ शकतो

Now the ‘free’ electricity of gravity at home | आता घरोघरी गुरुत्वाकर्षणाची ‘फुकट’ वीज

आता घरोघरी गुरुत्वाकर्षणाची ‘फुकट’ वीज

googlenewsNext

अपारंपरिक ऊर्जास्रोत म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्याने येतात ते म्हणजे सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि जलविद्युत! खनिज तेलाच्या वापरामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं, हे लक्षात आल्यापासून अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यासाठी सगळ्या जगातून प्रयत्न सुरू झाले. त्यात या तीन अपारंपरिक ऊर्जास्रोतांना बऱ्यापैकी यश मिळालं आणि ते आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झाले. मात्र असं असलं तरीही या प्रकारच्या ऊर्जानिर्मितीला त्याच्या त्याच्या मर्यादा आहेत. सतत ढग आले तर सौरऊर्जेच्या निर्मितीवर परिणाम होतो.

वाऱ्याचा वेग आणि दिशा यामुळे पवनऊर्जेच्या निर्मितीवर परिणाम होतो. मोठ्या जलप्रपातांपासून वीज निर्माण करण्यासाठी अत्यंत विशिष्ट प्रकारची भूरचना लागते. शिवाय या प्रकारचे वीजनिर्मिती संच उभारण्याची किंमतही प्रचंड असते. मात्र, तरीही या अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विचार करताना सतत आणि फुकट उपलब्ध असणाऱ्या ऊर्जास्रोताचा उपयोग मात्र आजवर कोणी केला नव्हता, ते म्हणजे गुरुत्वाकर्षण!

एडिनबर्गमधील ग्रॅव्हिटीसिटी नावाच्या स्टार्टअपने मात्र गुरुत्वाकर्षणाचा वापर करून वीजनिर्मिती करण्याच्या कल्पनेला सत्यात उतरवलं आहे. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात या ग्रुपने गुरुत्वाकर्षणावर चालणाऱ्या बॅटरीच्या प्रोटोटाईपची यशस्वी चाचणी केली. त्यांनी एक पन्नास फूट उंचीचा स्टीलचा टॉवर उभारला. त्यावर एका इलेक्ट्रिक मोटरच्या मदतीने पन्नास टन (पन्नास हजार किलो) वजनाचा एक धातूचा ठोकळा हळूहळू त्या टॉवरच्या सगळ्यात वरच्या टोकापर्यंत चढवला आणि मग तो हळू खाली जमिनीवर सोडला. हा ठोकळा खाली येण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेली ऊर्जा त्यांनी इलेक्ट्रिक जनरेटर्सकडे वळवली.

या यंत्रणेतील एखादा भाग निकामी झाला तर सगळी यंत्रणा बदलण्याची गरज नसून तेवढा निकामी झालेला भाग बदलता येऊ शकतो. या सगळ्या बाबींचा विचार करता याप्रकारे वीजनिर्मिती करणं किफायतशीर ठरू शकतं. कारण अशाप्रकारे वापरलेल्या या यंत्रणेचं आयुष्य काही दशक इतकं मोठं असू शकतं. हा प्रयोग जरी उंच टॉवर उभारून, त्यावरून वजन खाली सोडून केलेला असला, तरी ग्रॅव्हिटीसिटी या ग्रुपचं ध्येय हाच प्रयोग जमिनीखाली करण्याचं आहे.

ग्रॅव्हिटीसिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर चार्ली ब्लेअर म्हणतात की, “आपल्याला पृथ्वीच्या उंच-सखलपणाचा यासाठी सहज फायदा घेता येऊ शकतो. त्यामुळे त्यासाठी उंच टॉवर बांधणं व्यर्थ आहे.” ते आता हाच प्रयोग एखाद्या जुन्या बंद केलेल्या खाणीत करणार आहेत. गेलं वर्षभर त्यांचे इंजिनिअर्स ब्रिटन, पूर्व युरोप, दक्षिण आफ्रिका आणि चिलीमध्ये सोडून दिलेल्या खाणींची पाहणी करून त्यात त्यांच्या कामासाठी योग्य अशी जागा शोधत आहेत.

जुन्या, सोडून दिलेल्या खाणींमध्ये हे काम करणं हा यावरचा खरोखर चांगला पर्याय असू शकतो. कारण जगभर अशा वापरून निकामी झाल्यामुळे सोडून दिलेल्या अनेक खाणी आहेत. त्यातल्या अनेकांची खोली जवळजवळ ३०० मीटर्स किंवा जवळपास एक हजार फूट एवढी आहे. ही खोली ग्रॅव्हिटीसिटीच्या वीजनिर्मिती यंत्रणेला सहज पुरू शकते. अर्थात आत्ताच्या खाणींमध्ये असलेल्या सिव्हिल स्ट्रक्चरच्या भक्कमपणाचाही त्यासाठी त्यांना अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय खोल खाणींमध्ये मिथेन वायूचा धोका असू शकतो.

खाणींमध्ये पाणी साठणे हीही एक मोठी अडचण असू शकते. त्यामुळे या सगळ्या घटकांचा विचार करूनच त्यांना खाणीतील प्रकल्पाची जागा ठरवावी लागणार आहे. अशाप्रकारचा एखादा भूमिगत प्रकल्प २०२४ सालापर्यंत सुरू होऊ शकतो, असा ग्रॅव्हिटीसिटीचा अंदाज आहे. हा प्रायोगिक प्रकल्प बहुदा झेक रिपब्लिकमध्ये असणार आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्ती असेल तर असे ऊर्जानिर्मिती प्रकल्प अनेक ठिकाणी सुरू होऊ शकतात.

जगाला वरदान ठरणारे प्रकल्प
“आमचा हा प्रयोग खरोखर प्रायोगिक तत्वावरचा ‘प्रयोग’ असल्याने आम्ही तो अतिशय लहान प्रमाणात केला. मात्र, तरीही आम्हाला त्यातून तत्काळ २५० किलोवॅट वीजनिर्मिती करण्यात यश मिळालं. ही वीज सुमारे ७५० घरांना थोड्या काळासाठी पुरेशी ठरू शकते”, असं ग्रॅव्हिटीसिटीचे ज्येष्ठ वैज्ञानिक जिल मॅकफर्सन यांनी म्हटलं आहे. असे प्रकल्प जगाला वरदान ठरू शकतात, याकडे इतर संशोधकांनीही लक्ष वेधलं आहे.

Web Title: Now the ‘free’ electricity of gravity at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज