डोळ्यातील प्रतिबिंब पाहून त्याने शोधला पॉप सिंगरच्या घराचा पत्ता, मास्टर माइंड मजनूला अटक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:18 PM2019-10-15T13:18:39+5:302019-10-15T13:25:16+5:30
सोशल मीडियातील फोटोंमुळे गायिकेसोबत धक्कादायक घटना घडली आहे.
जपानमधील एका महिला पॉप गायिकेसोबत एक धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीवर जपानी महिला पॉप स्टारचा पाठलाग करणे आणि तिच्यावर हल्ला करण्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने या स्टारचे सोशल मीडियातील फोटो खासकरून तिच्या डोळ्यातील प्रतिबिंब पाहून तिच्या घराचा पत्ता लावला होता.
सोशल मीडियावर ठेवली नजर
हिबिकी सॅतो असं या टोकियोमध्ये राहणाऱ्या व्यक्तीचं नाव असून तो २६ वर्षाचा आहे. पोलिसांनी सांगितले की, हिबिकीने पॉप स्टारच्या सोशल मीडिया पोस्ट पाहून ही माहिती मिळवली की, ती कुठे राहते. यासाठी त्याने एक अनोखी पद्धत वापरली.
रिफ्लेक्शन आणि गुगल स्ट्रीट व्ह्यूची मदत
पोलिसांनुसार, हिबिकी हा महिला गायिकेचे फोटो झूम करून तिच्या डोळ्यातील रिफ्लेक्शनची माहिती काढत होता. म्हणजे या गायिकेने जिथे फोटो काढलाय, त्याचं प्रतिबिंब तिच्या डोळ्यात बघून त्यावरून त्याने अंदाज लावला की, तिचं घर कोणत्या परिसरात आहे. त्यानंतर त्याने गुगल स्ट्रीट व्ह्यू च्या मदतीने त्या परिसरातील घरे तपासू लागला. गायिकेच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या अॅंगलने त्याने अंदाज लावला की, तिच्या घराची खिडकी कोणती आहे.
घरी आल्यावर केला तिच्यावर हल्ला
पोलिसांचं म्हणणं आहे की, या पॉप स्टारच्या घराचा पत्ता मिळवल्यावर हिबिकी तासन्तास तिच्या घराखाली उभा राहू लागला. एक दिवस त्याने बस स्टॉप ते घरापर्यंत तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती एका इव्हेन्टमधून घरी परतत होती. पोलिसांच्या रिपोर्टनुसार, आजूबाजूला कुणीच नसल्याचं पाहून हिबिकीने तिचा चेहरा टॉवेलने झाकला. इतकेच नाही तर अंधाराचा फायदा घेत त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने पॉप स्टार तेथून कशीबशी पळण्यात यशस्वी ठरली.
१६ दिवसांनी अटक
या घटनेमुळे गायिका चांगलीच घाबरली आहे. तिला काही जखमाही झाल्या आहेत. पोलिसांनी गायिकेच्या तक्रारीनंतर १६ दिवसांनी हिबिकीला अटक केली. हिबिकीने मान्य केलं की, त्याने तिच्यावर हल्ला केला. त्याने असंही सांगितलं की, कशाप्रकारे तिच्या डोळ्यातील रिफ्लेक्शन पाहून तिच्या घराचा पत्ता काढला.