भारतीय शेतकऱ्यानं तयार केली अनोखी इलेक्ट्रीक कार; एलन मस्क देखील होतील हैराण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 05:31 PM2021-03-15T17:31:57+5:302021-03-15T17:33:43+5:30
कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय.
कला आणि कौशल्याला कशाची तोड नाही असं म्हणतात. भारतातील एका शेतकऱ्यानं अशीच एक भन्नाट कामगिरी केलीय. ओडिशामध्ये एका शेतकऱ्यानं चक्क सौरऊर्जेवर चार्ज होणारी इलेक्ट्रीक कार तयार केलीय. (odisha farmer electric vehicle that run 300km in a single charge)
तेलाच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत असताना आणि प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्यानं सध्या इलेक्ट्रीक वाहनांचा जमाना आला आहे. अनेक वाहन निर्मात्या कंपन्या आता इलेक्ट्रीन वाहन उत्पादनाकडे वळत आहेत. पण भारतातील एक सामान्य शेतकरी कोणतंही इंजिनियरिंगचं शिक्षण न घेता इलेक्ट्रीक कार तयार करू शकतो यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. ओडिशामधील शेतकऱ्यानं तसं करुन दाखवलंय.
ओडिशाच्या मयूरभंज येथील सुशील अग्रवाल नावाच्या शेतकऱ्यानं चारचाकी इलेक्ट्रीक वाहन तयार केलं आहे. विशेष म्हणजे ही कार सौरऊर्जेवर चार्ज होणारी आहे आणि एकदा चार्ज केल्यावर ती तब्बल ३०० किमी इतकी चालवता येते.
लॉकडाऊनमध्ये केली कमाल
सुशील अग्रवाल यांच्या घरीच एक वर्कशॉप आहे. कोविड-१९ च्या उद्रेकामुळे सगळं कामकाज ठप्प झालं होतं. अशावेळी फावल्या वेळेत सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार तयार करण्यावर काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. कारची बॅटरी साडेआठ तासांत पूर्णपणे चार्ज होते. स्लो चार्जिंग बॅटरी असल्यामुळे ती कमीतकमी १० वर्ष तरी चालेल, असा दावा सुशील यांनी केलाय.
"लॉकडाऊन लागलं तेव्ही मी घरीच होतो. लॉकडाऊन हटल्यानंतर इंधनाच्या दरात प्रचंड वाढ होणार याची कल्पना मला होती. त्यामुळे इलेक्ट्रीक कार बनविण्याचा विचार केला. यात मी स्वत:ला व्यग्र देखील ठेवू शकलो. कार तयार करण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडिओ आणि काही पुस्तकांनी मदत घेतली", असं सुशील अग्रवाल म्हणाले.
"लॉकडाऊनचा सदुपयोग त्यांनी सौरऊर्जेवर चालणारी कार तयार करण्यासाठी केला याचा मला आनंद आहे. या वाहनामुळे प्रदुषण होणार नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. हेच वाहनांचं भविष्य आहे", असं मयूरभंज येथील आरटीओचे प्रमुख गोपाल कृष्ण दास यांनी सांगितलं.