ऑनलाईन लुडो खेळताना प्रेमात पडली; मुलासाठी घरदार सोडून हरयाणात पोहोचली; अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 01:17 PM2021-10-14T13:17:50+5:302021-10-14T13:19:47+5:30
ऑनलाईन लुडो खेळता खेळता सूत जुळलं; प्रियकरासाठी प्रेयसीनं घरदार सोडलं
पानीपत: सोशल मीडिया आणि गेमिंग ऍपवर होणारी ओळखी, त्यातून होणारी मैत्री आणि मग याचं मैत्रीचं पुढे प्रेमात रुपांतर होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. स्मार्टफोनमध्ये असलेल्या ऍपमुळे नवे बंध जुळू लागले आहेत. अशीच एक घटना हरयाणातल्या पानीपतमध्ये घडली आहे. ऑनलाईन लुडो खेळताना हरयाणाचा मुलगा आणि ओदिशातील मुलीचं सूत जुळलं. मुलाशी लग्न करण्यासाठी मुलीनं घरदार सोडलं आणि थेट पानीपत गाठलं.
प्रियकराशी लग्न करण्यासाठी प्रेयसी सगळं काही सोडून पानीपतला आली. कुटुंबीयांनी लग्नासाठी विवाह मुहूर्त निश्चित केला. सोमवारी दोनाचे चार होणार होते. याची माहिती बाल विवाह विरोधी विभागाच्या अधिकारी रजनी गुप्ता यांना मिळाली. प्रियकरानं वयाची २१ वर्षे पूर्ण नसल्यानं गुप्ता यांनी वेळीच धाव घेत विवाह रोखला. प्रियकराला आणि त्याच्या कुटुंबाला मुलगा सज्ञान असल्याचा एकही पुरावा दाखवता न आल्यानं विवाह सोहळा रोखण्यात आला.
दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध होते. तरुणी २ ऑक्टोबरला मोठ्या बहिणीला सांगून घर सोडून पळाली. प्रियकराबद्दल मुलीच्या आईलादेखील कल्पना होती. मात्र तिचा या लग्नास विरोध होता. मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मुलीचं कुटुंब बिहारहून ओदिशाला राहायला गेलं. मुलगी नववीत शिकत आहे. तिच्या वयाचे पुरावे मागण्यात आले आहेत.
मुलीचं कुटुंब सनोली रोड परिसरात असलेल्या झोपडपट्टी भागात वास्तव्यास आहे. सोमवारी मुलाच्या घरी दोघांचा विवाह सुरू होता. मुलीकडून या लग्नाला कोणीही उपस्थित नव्हतं. लोकांनी बालविवाहाबद्दल जागरुक असायला हवं. अशा घटना आसपास घडत असल्यास त्या रोखायला हव्यात, असं आवाहन रजनी गुप्ता यांनी केलं.