Old Letter: ऐकावं ते नवलंच! तब्बल १०५ वर्षांनी पत्त्यावर पोहोचलं पत्र, लेटर बॉक्स उघडला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:48 PM2023-02-17T15:48:18+5:302023-02-17T15:50:20+5:30
ज्या पत्त्यावर पत्र पोहोचलं तिथे कोण राहात होतं माहित्येय... जाणून घ्या सविस्तर
Old Letter: पहिल्या महायुद्धात ब्रिटनमध्ये लिहिलेले एक पत्र तब्बल १०५ वर्षांनंतर आपल्या अपेक्षित पत्त्यावर पोहोचल्याची घटना घडली. ज्याला हे पत्र मिळाले त्याच्या मात्र आनंदाला पारावार उरलेला नाही. त्याला हे पत्र मिळाल्याने त्याला खूप आनंद आणि आश्चर्यही वाटले. हे पत्र १९१६ मध्ये बाथ, युनायटेड किंगडम येथून पाठवण्यात आले होते. या पत्रावर किंग जॉर्ज पंचम चा शिक्का असलेला स्टँप दिसतो आहे. अन् हे पत्र तब्बल १०५ वर्षांनी थिएटर डायरेक्टर फिनले ग्लेन यांच्या लंडनमधील फ्लॅटच्या लेटरबॉक्समध्ये पडलेले आढळले.
ग्लेन (२७) आणि त्याच्या मैत्रिणीला पत्र मिळताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी लिहिले की, 'हे १०० वर्षांहून अधिक काळ जुने असलेले पत्र इतका वेळ न फाटता सुरक्षित कसे राहू शकते हे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटले.' सीएनएनच्या वृत्तानुसार, या पत्राची माहिती गोळा करण्याच्या उद्देशाने स्थानिक ऐतिहासिक सोसायटीमध्ये नेण्यापूर्वी हे पत्र सुमारे एक वर्ष ग्लेनच्या घरातच होते.
हे पत्र पहिल्या महायुद्धात लिहिले होते!
स्थानिक इतिहास मासिक द नॉरवुड रिव्ह्यूचे संपादक स्टीफन ऑक्सफर्ड यांनी सांगितले की, संशोधनातून असे दिसून आले आहे की हे पत्र एका मित्राने दुसऱ्या मित्राला लिहिले होते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी बाथ शहरात सुट्टी घालवणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला, क्रिस्टाबेल मेनेलने केटी मार्शला ते पत्र पाठवले होते. केटी मार्श ही स्थानिक स्टॅम्प मॅग्नेट ओसवाल्ड मार्शची पत्नी होती, तर ख्रिस्ताबेल मेनेल ही हेन्री टुके मेनेल नावाच्या श्रीमंत चहा व्यापाऱ्याची मुलगी होती. हे पत्र पहिल्या महायुद्धात पाठवण्यात आले होते. या काळात किंग जॉर्ज पंचम हा सिंहासनावर पाच वर्षे होता आणि राणी एलिझाबेथचा जन्म व्हायला एक दशक बाकी होते.
पत्र ग्लेनकडे कसे पोहोचले?
ऑक्सफर्डने सांगितले की, हे पत्र पोस्टाच्या वर्गीकरणादरम्यान कार्यालयात हरवले होते, जे तेथेच राहिले. त्यामुळे कालांतराने पत्र पुढे आले आणि ग्लेनला मिळाले. प्रेषक किंवा प्राप्तकर्त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात आल्यास ग्लेन काय करेल, असे ग्लेनला विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला, 'त्यांच्या कौटुंबिक इतिहासाचा हा एक अद्भुत नमुना समोर आला आहे, त्यामुळे त्यांना हवे असल्यास ते स्वत:हून माझ्याकडून पत्र घेऊ शकतात.'
पत्रात मेनेलने लिहिले आहे की, 'मी जे काही केले, त्याबद्दल मला खूप विचित्र वाटते. मी येथे गोठवणाऱ्या थंडीत जगत आहे.' त्यावेळचे पर्यावरण, स्थानिक इतिहास आणि नॉरवुडमध्ये राहणाऱ्या लोकांची माहिती अतिशय रोमांचक असल्याचे ऑक्सफर्डने म्हटले आहे.