'इथे' सापडलं ४० हजार वर्ष जुन्या कोल्ह्याचं मुंडकं; दात, केस, जीभ अजूनही सुस्थितीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 01:06 PM2019-06-20T13:06:36+5:302019-06-20T13:10:35+5:30
या सायबेरियन कोल्ह्याच्या मुंडक्याचा आकार आताच्या कोल्ह्याच्या तुलनेत फार मोठा आहे.
रशियामध्ये एका ४० हजार वर्ष जुन्या सायबेरियन कोल्ह्याचा मुंडकं सापडलं आहे. या कोल्ह्याच्या मुंडक्याचा आकार आताच्या कोल्ह्याच्या तुलनेत फार मोठा आहे. रिपोर्टनुसार, ज्यावेळी आर्टिक परिसरात या कोल्ह्याचा मृत्यू झाला, तेव्हापासून त्याच्या मुंडकं बर्फाच्या डोंगराळ भागात जमिनीखाली दबलेलं होतं. त्यामुळेत अजूनही कोल्ह्याचं मुंडकं सुस्थितीत आहे. असे मानले जाते की, जगभरात सध्या २ लाख कोल्हे आहेत.
कोल्ह्याचं वय कसं कळालं?
कोल्ह्याचे अवशेष गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात रशियाच्या आर्कटिक यकुतिया परिसरातील तिरेख्याख नदी किनारी मिळाले होते. कोल्ह्याचं डोकं हे यकुतिया सायन्स अकॅडमीतील अभ्यासकांना दिलं गेलं होतं. त्यांनी जपान आणि स्वीडनमध्ये इतर काही अभ्यासकांसोबत मिळून यावर काम केलं. त्यानंतर त्यांना या कोल्ह्याच्या वयाची माहिती मिळाली.
अकॅडमीचे वालेली प्लोतनिकोव यांनी सांगितले की, ही कोल्ह्याची एका प्राचीन उप-प्रजाती आहे. जी मॅमथोसोबत राहते आणि नष्ट झाली आहे. हा कोल्हा ४० हजार वर्षांआधी मरण पावला होता. पण बर्फात दबलेला राहिल्याने त्याचे केस, दात, कान, जीभ आणि मेंदू जवळपास सुस्थितीतच आहेत.
हे मुंडकं ज्या कोल्ह्याचं सांगितलं जात आहे, तो कोल्हा शरीराच्या आकाराने आजच्या कोल्ह्यांपेक्षा साधारण २५ टक्के अधिक मोठा आहे. सायबेरियन कोल्हे वेगवेगळ्या आकाराचे असतात. त्यांचं वजन ३१ ते ६० किलोग्रॅम असू शकतं. तर त्यांची उंची ३ फूट आणि लांबी शेपटीसहीत ५ फूट असू शकते.