OMG! भारतात होते महाकाय डायनासोरचे अस्तित्व; नर्मदा खोऱ्यात सापडले 256 अंड्यांचे जीवाश्म
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:21 PM2023-01-23T18:21:21+5:302023-01-23T18:22:14+5:30
मध्य भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात डायनासोरचे जीवाश्म आढळले आहेत.
नवी दिल्ली : पृथ्वीवर काही लाख/कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचे वास्तव्य होते. पण, नंतर घडलेल्या काही नैसर्गिक घटनांमुळे डायनासोर नामशेष होऊन मानव प्रजातीची उत्पत्ती झाली. पण, आजही पृथ्वीवर अनेक ठिकाणी डायनासोरचे अवशेष सापडत असतात. यातच भारतीयांसाठी एक मोठी बातमी आहे. जगातील काही मोठ्या डायनासोरच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्या भारतात सापडले आहेत. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
संशोधकांनी मध्य भारतातील नर्मदा नदीच्या खोऱ्यात एकूण 256 जीवाश्मयुक्त अंडी असलेल्या 92 घरट्यांचा शोध लावला आहे. भारतातील जीवाश्मशास्त्रज्ञांनी मध्य भारतात वनस्पती खाणाऱ्या अवाढव्य आकाराच्या टायटॅनोसॉरसच्या(Titanosaur) वसाहती शोधल्या आहेत. या डायनासोरची 92 घरटी आणि 256 अंडी असलेले जीवाश्म येथे सापडले आहेत. मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यात सुरू असलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे.
PLOS ONE या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधाने भारतीय उपखंडातील टायटॅनोसॉरच्या जीवनाविषयीचे तपशील उघड केले आहेत. मध्य भारतातील नर्मदा खोऱ्यात स्थित लॅमेटा फॉर्मेशन, लेट क्रेटासियस कालखंडातील डायनासोरच्या सांगाड्याच्या जीवाश्मांसाठी आणि अंड्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे 145 ते 66 दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरचे अस्तित्वात होते, असे संशोधकांनी सांगितले. या घरट्यांचे तपशीलवार परीक्षण केल्यानंतर दिल्ली विद्यापीठातील संशोधक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या डायनासोरच्या जीवन सवयींबद्दल माहिती काढता आली.
घरट्यांच्या मांडणीच्या आधारे टीमचा असा अंदाज आहे की, या डायनासोरनी त्यांची अंडी आधुनिक काळातील मगरींसारखीच उथळ खड्ड्यात पुरली असावीत. संशोधकांनी सांगितले की, ही घरटी अगदी जवळ-जवळ बनवलेली आहेत. त्यांची अंडी 15 सेमी आणि 17 सेमी व्यासाची असून, यात टायटॅनोसॉरसच्या अनेक प्रजाती असू शकतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की हा नवीन शोध जीवाश्म इतिहासातील काही सर्वात मोठ्या डायनासोरबद्दल अधिक महत्त्वाचा डेटा देऊ शकेल.