बाबो... माशाला मिळाली 13 कोटींची बोली; एवढे आहे तरी काय त्यात?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 07:19 PM2020-01-05T19:19:05+5:302020-01-05T19:21:17+5:30
टोकिओच्या मुख्य मच्छी बाजारात रविवारी तब्बल 276 किलोंचा हा मासा खरेदी केला आहे.
टोकिओ : जपानच्या बाजारात एका माशाला तब्बल 18 लाख डॉलर म्हणजेच 13 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. जपानचे प्रसिद्ध उद्योजक कियोशी कीमुरा यांनी नवीन वर्षाच निमित्त साधून हा मासा खरेदी केला आहे.
टोकिओच्या मुख्य मच्छी बाजारात रविवारी त्यांनी तब्बल 276 किलोंचा हा मासा खरेदी केला आहे. हा मासा ट्युना जातीचा आहे. ही या प्रकारच्या माशाला मिळालेली दुसरी सर्वाधिक बोली आहे. महत्वाचे म्हणजे कियोशी यांनीच गेल्या वर्षी पहिली सर्वाधिक बोली लावली होती. त्यांनी 278 किलोंचा ट्यूना मासा तब्बल 31 लाख डॉलर म्हणजेच 22 कोटी रुपयांना खरेदी केला होता.
दुसरा ट्युना मासा खरेदी केल्यानंतर कियोशी यांनी सांगितले की, ते हा मासा त्यांच्या रेस्टॉरंटमधील ग्राहकांना देणार आहेत. कियोशी यांची रेस्टॉरंटची साखळी आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये जपानची खास थाळी शूसी मिळते. ज्यामध्ये भातासोबत समुद्री मासेही दिले जातात. समुद्री माशांमध्ये टूनाला जगभरात मोठी मागणी आहे. वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडनुसार ब्लूफिन टूना हा दुर्मिळ होत चालला आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्येच जपानमध्ये एका मोठ्या ट्यूना माशाला कियोशी यांनी खरेदी केले होते. यामुळे हा मासा चर्चेत आला होता. गेल्या वर्षी आयर्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर वेस्ट कॉर्क चार्टड कंपनीने 23 कोटींपेक्षा जास्त किंमतीचा ट्यूना मासा पकडला होता. मात्र, त्यांनी तो पुन्हा पाण्यात सोडला होता. कंपनीचे मालक डेव एडवर्ड यांनी सांगितले की, ते व्यापारासाठी मासेमारी करत नव्हते. यामुळे त्यांनी हा मासा परत पाण्यात सोडला.
पृथ्वीवरचा 'मंगळ'; काही दशकांपर्यंत पावसाचा थेंबही पडत नाही