पोटातून सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:08 PM2017-10-04T14:08:05+5:302017-10-04T15:34:56+5:30
सोन्याची बिस्किटे घेऊन एवढ्या लांबून प्रवास करूनही तो प्रवासी अगदी व्यवस्थित होता. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्यासाठी रवाना करण्यात आले.
लोकं वस्तूंच्या तस्करीसाठी वेगवेगळ्या युक्त्या आजमावतात. त्यातही परदेशातून भारतात एखाद्या वस्तूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कली लढवल्या जातात. पण एका श्रीलंकन व्यक्तीने चक्क पोटातून सोन्याच्या बिस्किटांची तस्करी केल्याचे नुकतेच उघड झाले आहे. श्रीलंकन एअरवेजने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला रविवारी सकाळी विशाखापट्टणम येथील विझाग विमानतळावर पकडण्यात आले. त्याने त्याच्या पोटातून तब्बल १४ सोन्याची बिस्किटं लपवून तस्कर करत होता. त्याच्या विचित्र पद्धतीने चालण्यावरून सुरक्षा रक्षक आणि कस्टम्स अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, त्या प्रवाश्याचे वागणे पाहून तेथील सुरक्षा रक्षकांना संशय आला. शिवाय तो ग्रीन कस्टम्स चॅनेलच्या दिशेने घाईघाईत जाताना दिसला. कस्टम्स ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे सामान नव्हते, त्यामुळे तेथील रक्षकांचा संशय आणखी बळावला. सुरक्षा रक्षक आणि कस्टम्स कर्मचाऱ्यांनी त्याची झडती घेतली तरी त्यांना काहीच सापडले नाही. शेवटी त्यानेच सोन्याची बिस्किटे गिळली असल्याचे कबुल केले.
त्याच्या या जबाबानंतर सगळेच आश्चर्यचकित झाले. सोन्याची बिस्किटे घेऊन एवढ्या लांबून प्रवास करूनही तो प्रवासी अगदी व्यवस्थित होता. त्यामुळे त्याला विझाग येथील किंग-जॉर्ज हॉस्पिटलमध्ये एक्स-रे काढण्यासाठी रवाना करण्यात आले. एक्स-रेच्या रिपोर्टसमध्ये त्याच्या पोटात सोन्याची बिस्किटे असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय डॉक्टरांनी त्याच्या पोटातील सोन्याची बिस्किटे बाहेर काढली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या प्रवाशाने आधी ७ बिस्किटे आणि नंतर ७ बिस्किटे खाल्ली होती. या प्रवाशाची तब्येत आता व्यवस्थित असून पुढील चौकशीकरता कस्टम्स अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. पोटाच्या आतून कोणत्याही प्रकारची तस्करी केल्याचा हा प्रकार भारतात पहिल्यांदाच झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सर्व प्रतिमा - ANI