दोघींचाही गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड. पण, पहिल्यांदाच ‘त्या' एकमेकींना भेटतात, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 07:42 AM2024-11-28T07:42:36+5:302024-11-28T07:44:04+5:30

गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डने किशोरवयात रुमेयसाची दखल घेतली तेव्हा तिला फार विशेष वाटलं. आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, याची जाणीव तिला पहिल्यांदा झाली.

One is the tallest woman in the world, the other is the shortest woman in the world. Rumeysa Gelgi is from Turkey, with Jyoti Amge is from India meet first time | दोघींचाही गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड. पण, पहिल्यांदाच ‘त्या' एकमेकींना भेटतात, तेव्हा...

दोघींचाही गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड. पण, पहिल्यांदाच ‘त्या' एकमेकींना भेटतात, तेव्हा...

स्थळ : लंडन येथील द सॅव्होय हाॅटेल. तिथे १६ नोव्हेंबर रोजी गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड दिवस साजरा करण्यासाठी लोक जमले होते. सगळ्यांच्या नजरा मात्र त्या दोघींवर खिळल्या होत्या. दोघींच्याही नावावर गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड. पण, प्रत्यक्षात एकमेकींना भेटण्याची त्या दोघींची ही पहिलीच वेळ. एक जगातली सर्वांत उंच महिला, तर दुसरी जगातली सर्वांत कमी उंचीची महिला. रुमेयसा गेल्गी ही तुर्कीतली, तर ज्योती आमगे ही भारतातली. त्या दिवशी दोघींनी एकमेकींसोबत एक अख्खी दुपार घालवली. एकमेकींसोबत चहा घेत, पेस्ट्रीज खात त्यांनी भरपूर गप्पा मारल्या. एकमेकींच्या आवडीनिवडींबद्दल जाणून घेतलं. ज्योतीलाही आपल्यासारखी मेकअप करण्याची, स्वत:ची काळजी घेण्याची, नखं रंगवण्याची, दागिने घालण्याची हौस आहे, हे बघून रुमेयसाला खूप बरं वाटलं.

‘मला लोकांशी बोलताना नेहमीच मान वर करून बोलावं लागतं. पण, आज जिच्याशी मान वर करून बोलले ती व्यक्ती जगातली सर्वांत उंच स्त्री असल्याने मला खूप आनंद होत आहे’, ही ज्योतीची प्रतिक्रिया होती. दोघींच्या उंचीत खूप फरक. दोघी एकमेकींना भेटल्या. पण, नजरेला नजर काही भिडवता आली नाही. तरीही त्या भेटीत दोघींनी एकमेकींबद्दल जे अनुभवलं, त्यामुळे दोघींमधले बंध मात्र घट्ट झाले. गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डने अशा प्रकारे टोकाची उंची असलेल्या दोघींना एकत्र आणून जगाला माणसांमधील विविधतेचा, भिन्नतेचा सन्मान करण्याचा संदेश दिला. या भेटीच्या बातम्या प्रसिध्दी माध्यमात झळकल्या तेव्हा जगातल्या सर्वांत उंच महिला असलेल्या २७ वर्षांच्या रुमेयसा गेल्गीबद्दलची लोकांमधली उत्सुकताही वाढली. 

तुर्कीमधील रुमेयसा ही कार्यकर्ता, उत्तम वक्ता आणि वेब डेव्हलपरही आहे. २०१४मध्ये रुमेयसाच्या उंचीकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं. ७ फूट ०.०९  इंच उंची असलेली ती जगातली सर्वांत उंच किशोरवयीन मुलगी ठरली. पुढे ती जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा ७ फूट ०.७  इंच उंची असलेली रुमेयसा जगातली सर्वांत उंची स्त्री ठरली. २०२१ मध्ये तिच्या नावावर आणखी गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड्सची नोंद झाली. १ जानेवारी १९९७ रोजी रुमेयसा जन्माला आली. जन्मत:च सर्वसामान्य नवजात बाळाच्या उंचीपेक्षा तिची उंची खूप जास्त होती. जन्मत:च तिच्यात विव्हर सिंड्रोमची लक्षणं आढळली. हा सिंड्रोम तिची आयुष्यभर सोबत करणार हे तेव्हाच नक्की झालं. दुर्मीळ जनुकीय उत्परिवर्तन असलेल्या या स्थितीत जगणं हे रुमेयसासाठी सगळ्यात मोठं आव्हानं होतं. ती एक वर्षाची होत नाही तर तिच्या हृदयावर मोठी शस्त्रक्रिया करावी लागली. या सिंड्रोममुळे तिला एकामागोमाग अनेक शस्त्रक्रियांना तोंड द्यावं लागलं. आता तिची वैद्यकीय स्थिती स्थिर असून, उंची वाढणंही थांबलं आहे. 

रुमेयसाने २०१६ मध्ये माध्यमिक शाळेतली पदवी मिळवली. पण, तिला तिच्या उंचीमुळे कधीच शाळेत जाता आलं नाही. तिने होम स्कूलिंगद्वारे स्वत:चं शिक्षण पूर्ण केलं. २०२० मध्ये कोविड १९च्या विलगीकरणाच्या काळात वेब डेव्हलपरचं ऑनलाइन शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असताना रुमेयसामधलं धाडस वाढत होतं. रुमेयसाला तिच्या स्थितीबद्दल बोलताना कधीच संकोच वाटला नाही. ती संधी मिळेल तिथे विव्हर सिंड्रोम, या स्थितीतील आव्हानं, उपलब्ध उपचार, या स्थितीतलं जगणं याबद्दल बोलू लागली. 

गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डने किशोरवयात रुमेयसाची दखल घेतली तेव्हा तिला फार विशेष वाटलं. आपण सगळ्यांपेक्षा वेगळे आहोत, याची जाणीव तिला पहिल्यांदा झाली. या वेगळेपणाचं तिला कौतुक वाटू लागलं. विव्हर सिंड्रोममुळे वाट्याला आलेल्या आव्हानात्मक जगण्यात तिच्या कुटुंबाने तिला नेहमी साथ दिली.  उंचीमुळे तिच्यात कधीच न्यूनगंड निर्माण झाला नाही. स्वत:च्या स्वीकाराची प्रक्रिया खूप लहानपणीच तिच्यात सुरू झाली होती. आपल्या जगण्याचा सकारात्मक विचार केला, तर आनंदी राहण्याच्या, पुढे जाण्याच्या, लोकांच्या उपयोगी पडण्याच्या अनेक संधी दिसतात, या विचाराने रुमेयसा जगते आणि हाच संदेश ती तिच्यासारख्या अवस्थेत जगणाऱ्या प्रत्येकाला देते. स्कोलिओसिस या स्थितीमुळे तिच्या पाठीचा मणका वक्राकार झाल्याचं २०१८च्या एका तपासणीत आढळलं. या स्थितीचाही तिने ‘आय ॲम स्ट्रेट फाॅरवर्ड’ म्हणत स्वीकार केला होता, हे विशेष!

रुमेयसा : पाच गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड

जगातली सगळ्यात उंच किशोरवयीन मुलगी, जगातली सर्वांत उंच महिला असा विक्रम नोंदवणाऱ्या रुमेयसाच्या नावावर महिलांमधील सर्वांत लांब बोट (११.२ सें.मी.) महिलांमधील सर्वांत लांब हात (२४.९३ सें.मी.) आणि महिलांमधील सर्वांत लांब पाठ (५९.९० सें.मी.) असे आणखी तीन गिनीज वर्ल्ड रेकाॅर्ड आहेत. तिचे अवघे आयुष्य हा एक संघर्ष खरा, पण ती तो हसतमुखाने निभावते आहे, एवढेच नव्हे, तर इतर अनेकांना मदतही करते आहे.

Web Title: One is the tallest woman in the world, the other is the shortest woman in the world. Rumeysa Gelgi is from Turkey, with Jyoti Amge is from India meet first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.