'लग्न करेन तर तुझ्याशीच!' एकतर्फी प्रेमात तरुणीनं सोडलं खाणं-पिणं; तरुणानं गाठलं पोलीस ठाणं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 03:14 PM2022-05-12T15:14:56+5:302022-05-12T15:15:12+5:30
एकतर्फी प्रेमात तरुणी वेडी झालीय, तिचे घरचे लग्नासाठी मागे लागलेत, साहेब वाचवा हो! तरुणानं मांडली व्यथा
एकतर्फी प्रेमाला वैतागलेल्या एका तरुणानं सुटकेसाठी थेट पोलीस ठाणं गाठलं आहे. तरुणीचं एकतर्फी प्रेम, तिच्या कुटुंबीयांचा लग्नासाठीचा दबाव यामुळे त्रस्त झालेल्या तरुणानं पोलीस ठाण्यात जावून आपली व्यथा मांडली. मला त्या मुलीशी विवाह करायचा नाही. मला संरक्षण द्या, अशी मागणी तरुणानं पोलिसांकडे केली. मध्य प्रदेशच्या मुरैना जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.
सबलगड येथील एका गावात वास्तव्यास असलेल्या २२ वर्षांच्या तरुणीचं शेजारच्याच गावात राहणाऱ्या नवलेश कुशवाहावर प्रेम जडलं. दोघांमध्ये आधी मैत्री होती. तरुणीनं अनेकदा तरुणाकडे तिचं प्रेम व्यक्त केलं. मात्र तरुणानं वारंवार तिला नकार दिला. त्यामुळे तरुणीनं खाणं-पिणं सोडलं. तरुणीचं नवलेशवर प्रेम असल्याचं तिच्या कुटुंबीयांना समजलं. त्यानंतर ते नवलेशवर लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागले.
नवलेश आणि तरुणी एकाच जातीचे आहेत. त्यामुळे याबद्दल पंचायत बसली. दोन्ही पक्ष आमनेसामने आले. तरुणीनं सर्वांसमोर प्रेमाची कबुली दिली. नवलेशनं लग्नासाठी नकार देताच तिनं जीव देण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीचे नातेवाईक आपल्या घरी येऊन जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप नवलेशनं केला. त्यामुळेच नवलेशनं सबलगड पोलीस ठाणं गाठलं आणि सुरक्षा देण्याची मागणी केली.
नवलेश कुशवाहा नावाच्या तरुणानं अर्ज दिल्याचं अतिरिक्त एसपी रायसिंह नरवरिया यांनी सांगितलं. या प्रकरणात तरुण तरुणी सज्ञान आहेत. दोघांमध्ये आधी मैत्री होती. आता तरुणीला नवलेशशी लग्न करायचं आहे. दोघेही एकाच समाजाचे आहेत, अशी माहिती नरवरिया यांनी दिली.