कचऱ्याच्या डब्यात सापडलं अवघं १२ तासांचं स्त्री अर्भक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 03:55 PM2017-10-12T15:55:19+5:302017-10-12T15:58:20+5:30
घटनास्थळी असलेल्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी हा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी शोधाशोध सुरू केली.
थायलंडमधील चिआंग मई शहरात कचऱ्याच्या डब्यात एका पिशवीत गुंडाळलेलं स्त्री अर्भक सापडलं. रविवारी रात्री ८च्या सुमारास हे बाळ सापडलं असून त्यावेळेस ती अवघी १२ तासांची होती. इतका वाईट प्रकार कोणी केला, असा संताप स्थानिक व्यक्त करित आहे. सोबत त्या मुलीसाठी करुणाही व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी असलेल्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी हा आवाज नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी शोधाशोध सुरू केली तेव्हा हा प्रकार उघडकीला आला. एका ब्लँकेटमध्ये गुंडाळून तिला बॅगेत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर बॅग कचऱ्याच्या डब्यात फेकण्यात आली. सुदैवाने ती आता सुखरुप आहे.
घट्ट गुंडाळली गेली असल्याने तिला श्वसनाचा त्रास होत होता. स्थानिकांनी तातडीने पोलिसांना बोलावून तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिला वेळीच उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं.
तेथील लान्ना हॉस्पिटलमधील जिरॅलॅक जंकर्झाय यांनी सांगितल्यानुसार, बाळ आता व्यवस्थित असून अगदी सदृढ आहे. आता सर्वसाधारण बाळासारखी त्याची वाढ होऊ शकते. ते पुढे म्हणाले, ‘या बाळाचा जन्म रविवारी सकाळी झाला असावा. त्यानंतर त्याच्या मातेने त्याला फेकून दिलं असावं.’
ही घटना प्रसिद्धी माध्यमातून बाहेर आल्यानंतर अनेकांनी रुग्णालयाला भेट तिला दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र योग्य काळजी घेणाऱ्या कुटूंबालाच हे बाळ देण्यात येणार आहे. त्यासाठी दत्तक घेण्यासाठी आलेल्या पालकांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पोलिसांची चौकशी सुरू आहे. बाळाला तिथे कोणी फेकलं याचा शोध घेण्यासाठी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणी सुरु आहे.
फोटो सौजन्य - www.thesun.co.uk