आज ऑर्डर करा परवा मिळेल! १०-२० नाही, तर तब्बल १७ हजारांचं एक सँडविच; पाहा काय आहे खास?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 09:35 AM2023-04-14T09:35:48+5:302023-04-14T09:36:49+5:30
सँडविच खायला आपल्या सर्वांनाच आवडतं. पण एका रेस्तराँमध्ये असं सँडविच विकलं जात आहे जे सर्वांनाच परवडणारं नाही.
खाण्यापिण्याच्या महागड्या पदार्थांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. काही वेळा एखाद्या डिशची अवाजवी किंमतही आपण ऐकली असेल. आता ही माहिती एका सँडविचशी संबंधित आहे. साधारणपणे सँडविच म्हटलं तर ५०-१०० रुपये किंवा जास्तीतजास्त १५० रुपये असा आपला समज असतो. पण, न्यूयॉर्कमधील Serendipity 3 या रेस्तराँनं काही काळासाठी आपल्या मेन्यूमध्ये खास सँडविचचा समावेश केलाय. हे क्विंटेसेंशियल ग्रील्ड चीज सँडविच जगातील सर्वात महाग सँडविच आहे, ज्याची किंमत २१४ डॉलर्स म्हणजेच सुमारे १७,५०० रुपये आहे.
या सँडविचमधील खास पदार्थ आणि प्रचंड किंमतीमुळे या सँडविचचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. हे सँडविच बनवणाऱ्या सेरेंडिपिटी ३ रेस्तराँच्या नावे सर्वात महागडं डेझर्ट, सर्वात महाग हॅम्बर्गर, सर्वात महाग हॉट डॉग आणि सर्वात मोठा वेडिंग केक यांचीही नोंद आहे.
विशेष शँपेन ब्रँडचा वापर
यामध्ये डोम पेरिग्नॉन शॅम्पेनपासून बनवलेल्या फ्रेन्च पुलमन शॅम्पेन ब्रेडचा वापर करण्यात येत असून त्यात विशेष प्रकारचं व्हाईट ट्रफल बटर टाकण्यात आलं आहे. यामध्ये अतिशय अनोखे आणि महाग कॅसिओकाव्हॅलो पोडोलिको चीज वापरण्यात येतं.
आज ऑर्डर करा परवा मिळेल
आणखी अजब बाब म्हणजे हे सँडविच खाण्यासाठी एखाद्याला किमान ४८ तास अगोदर ऑर्डर द्यावी लागते. विविध ठिकाणांहून सामान मागवलं जात असल्यानं ते बनवण्यासाठी इतका वेळ लागतो. स्पेशल चीजमध्ये ग्रिल केल्यानंतर ते त्रिकोणाच्या आकारात कापलं जातं आणि २३ कॅरेट एडिबल गोल्ड फ्लेक्ससह विशेष Baccarat crystal प्लेटमध्ये सर्व्ह केलं जातं. सोबतच Baccarat ग्लासमध्ये Lobster Tomato Bisque देखील दिलं जातं.