VIDEO: चांद नवाबचा भाऊ आला रे! पाकिस्तानी पत्रकाराचं चक्क गाढवावर बसून रिपोर्टिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:47 PM2018-12-20T19:47:24+5:302018-12-20T19:51:25+5:30
पाकिस्तानी पत्रकाराच्या व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
नवी दिल्ली: कराची से लोग अंदरुने मुल्क ईद मनाने जा रहे है, असं म्हणणारा पाकिस्तानमधला रिपोर्टर चांद नवाब तुम्हाला नक्की आठवत असेल. एक वाक्य म्हणताना असंख्य टेक घेणाऱ्या चांद नवाबनं यूट्यूबसह सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. यानंतर आता पाकिस्तानमधील आणखी एका रिपोर्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. विशेष म्हणजे या पत्रकारानं चक्क गाढवावर बसून रिपोर्टिंग केलं आहे.
लाहोरमध्ये रिपोर्टिंग करणाऱ्या अमीन हाफिज यांचा व्हिडीओ सध्या तुफान वायरल झाला आहे. गाढवावर बसून रिपोर्टिंग करणारे हाफिज यादरम्यान खालीदेखील पडले. पाकिस्तानमधले प्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांनी हा गमतीशीर व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पाकिस्तानमधल्या जिओ न्यूज या वृत्तवाहिनीनं गाढवांच्या वाढत्या संख्येवर एक विशेष वृत्तांत तयार केला. पंजाब लाईवस्टॉक विभागाच्या आकडेवारीनुसार एकट्या लाहोरमध्ये 41 हजारहून अधिक गाढवं आहेत. पाकिस्तान गाढवांच्या संख्येत जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Donkey business flourishing in Lahore and look at the way my old Freind Amin Hafeez reporting donkey business by risking his life pic.twitter.com/FHYuQrYOqP
— Hamid Mir (@HamidMirPAK) December 19, 2018
गाढवांना साथीचे रोग होऊ नयेत म्हणून शहरात त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयं तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी पशू वैद्य आजारी गाढवांवर उपचार करतात. सोबतच ठणठणीत असणाऱ्या गाढवांची प्रकृती कायम उत्तम राहावी, यासाठी त्यांना औषधंसुद्धा देतात. विशेष म्हणजे ही सुविधा मोफत उपलब्ध आहे. पाकिस्तानातील गाढवांची किंमत सरासरी 35 ते 55 हजार रुपये इतकी आहे. एका गाढवापासून मालक दिवसाला सरासरी हजार रुपये कमावतो. याशिवाय गाढव विकल्यावरही चांगली रक्कम हाती येते. विशेष म्हणजे गाढव वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून त्याच्या मालकाला कमाई करुन देतं.