पाकिस्तानातील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 08:09 AM2023-03-04T08:09:07+5:302023-03-04T08:09:19+5:30
पाकिस्तानतील एका वाहिनीवर अँकर म्हणून काम करणाऱ्या मार्व्हिया मलिकवर जीवघेणा हल्ला झाला. ती तिच्या लाहोरमधील घरून काहीतरी औषध घेण्यासाठी ...
पाकिस्तानतील एका वाहिनीवर अँकर म्हणून काम करणाऱ्या मार्व्हिया मलिकवर जीवघेणा हल्ला झाला. ती तिच्या लाहोरमधील घरून काहीतरी औषध घेण्यासाठी जवळच्या औषधांच्या दुकानात गेलेली असताना तिच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या आणि त्यातून ती कशीबशी बचावली. खरं म्हणजे पत्रकारांवर हल्ले होणं ही काही तशी दुर्मीळ घटना नाही. मग मार्व्हिया मलिकवरच्या हल्ल्याबद्दलच इतकी चर्चा का? कारण मार्व्हिया ट्रान्सजेंडर आहे. ती पाकिस्तानमधील पहिली ट्रान्सजेंडर न्यूज अँकर आहे. तिच्यामुळे ट्रान्सजेंडर महिलांचा विषय पाकिस्तानमध्ये चर्चेत आला आणि तेव्हापासूनच तिला धमक्या दिल्या जाऊ लागल्या. या धमक्यांमुळे ती काही दिवस तिचं लाहोरमधलं घर सोडून दुसरीकडे राहायला गेली होती. ती तिच्या एक शस्त्रक्रियेसाठी लाहोरमध्ये आलेली असताना तिच्यावर हा जीवघेणा हल्ला झाला.
मार्व्हियाचं आयुष्य सुरुवातीपासूनच खडतर होतं. तिचा जन्म १९९७ साली झाला. तिला तीन भावंडं आहेत; पण मार्व्हियाला शाळेत असल्यापासून बरोबरीच्या मुलांच्या चिडवण्याला तोंड द्यावं लागलं. तिच्या बरोबरच्या मुला-मुलींनीही तिला अनेक प्रकारे त्रास दिला. तिची लैंगिक ओळख जशी स्पष्ट होत गेली तशी तिच्या घरच्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. इतकं की मॅट्रिक झाल्यानंतर तर तिच्या घरच्यांनी तिच्याबरोबर असलेले सर्व संबंध तोडले. जणू काही ती आपली मुलगी नाहीच!... झाले. अर्थातच यामुळे त्यांनी तिला शिक्षण घेण्यासाठी मदत करण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यावेळी ती इतर ट्रान्सजेंडर सहकाऱ्यांच्या आश्रयाने राहिली.
या सगळ्या काळात वकील किंवा पत्रकार होण्याचं ध्येय तिने कधीच सोडलं नाही. तिने पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये मास मीडियाच्या कोर्सला प्रवेश घेतला खरा; पण शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठाच प्रश्न होता. त्याहूनही मोठा प्रश्न होता तो म्हणजे जगायचं कसं, त्यासाठी लागणारे पैसे कसे उभे करायचे हा. मार्व्हिया म्हणते त्याप्रमाणे समाजात ट्रान्स व्यक्तींकडे फक्त कुचेष्टेच्या नजरेने बघितलं जातं. त्यांच्यात काही क्षमता असू शकेल असा कोणी विचारही करत नाही. त्यांना पटकन काम मिळत नाही. त्यांच्या शिक्षणाकडे कोणीच बघत नाही. लैंगिकता ही त्यांची एकमेव ओळख आहे असंच लोकांना वाटतं आणि त्यापुढे त्यांना इतर कुठलीही ओळखच मिळू शकत नाही.’
कितीही अडचणी आल्या तरी शिक्षण पूर्ण करून हवं ते करिअर करण्याचा मार्व्हियाचा निर्धार पक्का होता. ते साध्य करण्यासाठी पैसे कमावणं गरजेचं होतं. अशा वेळी तिला हात दिला तो परफॉर्मन्स इंडस्ट्रीने. मार्व्हियाने मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यात तिला कामं मिळायला लागली आणि तिच्या जगण्याचा प्रश्न सुटला. तिला त्यातून इतके पैसे मिळू लागले की तिला तिचं शिक्षण सहज पूर्ण करता आलं, शिवाय काही पैसे शिल्लकही पडू लागले. याच काळात तिने फॅशन इंडस्ट्रीत मॉडेल म्हणूनही काम केलं. लाहोरमध्ये भरवण्यात आलेल्या फॅशन डिझाइन काउन्सिल फॅशन वीकमध्ये ती मॉडेल म्हणून रॅम्पवर गेली.
पैशांचा प्रश्न सुटल्यावर मार्व्हियाने मास मीडियामध्ये डिग्री घेतली; पण त्याहीनंतर एका ट्रान्सजेंडर महिलेसाठी पाकिस्तानसारख्या धार्मिक इस्लामी देशात न्यूज अँकर म्हणून नोकरी मिळवणं सोपं नव्हतं. तिला ही संधी दिली ती कोहिनूर न्यूज चॅनेलने. मार्व्हिया मार्च २०१८ मध्ये पाकिस्तानी न्यूज चॅनेलमध्ये काम करणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला ठरली. मार्व्हियाने स्वतःचं ट्रान्सजेंडर असणं कधीही लपवलेलं नव्हतं. ती उजळमाथ्याने आपली लैंगिक ओळख सांगून न्यूज अँकर झाली. अशा व्यक्तीला हे काम देणाऱ्या कोहिनूर या पाकिस्तानी चॅनेलचं घोषवाक्य आहे, ‘आझाद भी, जिम्मेदार भी”. हे न्यूज चॅनेल मार्व्हियाच्या बाबतीत खऱ्या अर्थाने स्वतःच्या ब्रीदवाक्याला जागलं. त्यांनी तिला नोकरीही दिली आणि त्यासाठी लागणारं प्रशिक्षणही दिलं.
भिन्नलिंगी लोकांचा आवाज
मार्व्हिया मलिक न्यूज अँकर झाल्यानंतर पाकिस्तानी माध्यम जगतात मोठी खळबळ उडाली. तिथल्या प्रतिगामी लोकांना अर्थातच तिने अशी स्वतःची लैंगिक ओळख जाहीर करणं आवडलं नाही. तिला त्यामुळे कायमच धमक्या देण्यात आल्या; पण मार्व्हिया घाबरली नाही. तिने तिचं करिअर सोडलं नाही. नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत अली असली, तरी गेली काही वर्षं पाकिस्तानमधल्या भिन्नलिंगी लोकांचा ती आवाज ठरली आहे. मार्व्हिया मलिकला पाकिस्तानमधल्या ट्रान्सजेंडर आणि एकूणच भिन्नलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी काम करायचं आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींना नोकरी आणि संसदेत आरक्षण मिळावं, यासाठी आता तिचा लढा सुरू आहे.