या तुरुंगातल्या कैद्यांना दिलं जातं पंचपक्वान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 11:52 AM2017-10-31T11:52:56+5:302017-10-31T12:07:40+5:30
तुरुंग आणि वसतिगृह इथलं जेवण कसं असतं ते आपल्याला माहित आहेच. पण जगात असंही जेल आहे जिथे कैद्यांना पंचपक्वान दिलं जातं.
लिव्हरपुल : तुरुंगात कैद्यांना शिळंपाकं खायला देतात हे आपल्याला सर्वांना माहित आहे. कैद्यांसाठी खास पंचपक्वांनाची आरास केल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का. असं जर कोणी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला नवलच वाटेल. नाही का?
सगळ्याच देशात कैद्यांची जेवणासाठी फार बोळवण केली जाते. त्यांना एखादी चपाती त्यावर शिळी भाजी किंवा कधीकधी शिळा ब्रेड यावरच समाधान मानावं लागतं. शिळ्या अन्नपदार्थाचा त्यांच्या शरीरावरही विपरीत परिणाम होत असतात. पण यु.केतील एचएमपी लिव्हरपूलचं तुरुंग या सगळ्यांसाठी अपवाद आहे. तेथे कैद्यांना रोज पंचपक्वान दिलं जातं. महिन्यातील चार आठवड्यांचा जेवणाचा मेन्यू त्यांचा नियोजित असतो. कोणत्या दिवशी काय बनणार याचं आधीच नियोजन करण्यात येतं. प्रत्येक आठवड्यात नव-नव्या डिश कैद्यांना दिल्या जातात. रोटेशन पद्धतीने कैद्यांना येथे जेवण दिलं जातं.
महिन्यातील पहिल्या आठवड्यात काय असेल, दुसऱ्या आठवड्यात काय द्यायचं याचं व्यवस्थापन कैद्यांच्या आवडीनुसार केलं जातं. त्यानुसारच त्यांना जेवण दिलं जातं. त्यातही शाकाहारी आणि मासांहारी असे दोन गट असतील त्यांना त्याचप्रकारचं जेवण दिलं जातं. शाकाहारींसाठी विविध भाज्यांचे सूप तर मासांहारीसाठी नॉनव्हेज सुप असतं. एवढंच नाही, तर प्रत्येकासाठी खास ‘लंच पॅक’ही उपलब्ध असतं. शनिवारी-रविवारी खास डिनरचं आयोजन केलं जातं. त्यात सगळेच कैदी मनसोक्त पोटभरून जेवून घेतात. रात्रीचं आणि दुपारचं जेवण झाल्यावर कैद्यांसाठी आईस्क्रीम, केक, फळंही खायला दिली जातात.
त्याचबरोबर सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचा नाश्ताला विशेष खाण्याची सोय केली जाते. मटन, मासे, आईस्क्री, केक, फळं असं सारं काही पुरवणारा हा एकमेव तुरुंग असेल. त्यामुळे या तुरुंगात येण्यासाठी कैदी मुद्दामहून काही गुन्हे करत नसतील ना अशीही शंका उपस्थित करण्यात येत आहे.
सौजन्य - www.mirror.co.uk