फुटबॉलरच्या किकने उडते विमान कोसळले, 60 वर्षांपूर्वी नेमकं काय झालं होतं? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 05:16 PM2022-08-21T17:16:35+5:302022-08-21T17:17:59+5:30
रॉबर्ट गॅब्रिएल ट्रायगो नावाच्या फुटबॉलपटूने एका किकमध्ये उडते विमान पाडले होते. वाचा धमाल किस्सा...
Footballer Brought Down a Flying Plane : फुटबॉल हा जगातील अनेक देशात खेळला जाणारा खेळ आहे. जगभरात क्रिकेटपेक्षा जास्त फुटबॉलचे चाहते आहेत. फुटबॉल खेळात अनेकदा अनपेक्षित गोष्टी घडत असतात. अशीच एक अनपेक्षित आणि विश्वास न बसणारी घटना 60 वर्षांपूर्वी घडली होती. एका 17 वर्षीय फुटबॉलपटूने इतकी जोरदार किक मारली होती की, उडते विमान कोसळले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही घटना खरी आहे. एका पॅराग्वेयन फुटबॉलपटूने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी उडते विमान फुटबॉलने पाडले होते.
एका शॉटमध्ये विमान पाडले
फुटबॉलपटू रॉबर्ट गॅब्रिएल ट्रायगो(Roberto Gabriel Trigo) आज 80 वर्षांचे झाले आहेत. हा पराक्रम केला, तेव्हा ते अवघ्या 17 वर्षांचे होते. रॉबर्ड तेव्हा असुनसियनच्या जनरल जीन्स फुटबॉल क्लबमध्ये खेळायचे. काही लोक म्हणतात की, ते सराव सामना खेळत होते, तर काही लोक म्हणतात की त्यांनी अधिकृत सामन्यात हा पराक्रम केला.
नेमकं काय झालं...
स्पॅनिश न्यूज एजन्सी EFE शी बोलताना रॉबर्टो म्हणाले की, 'विमान उडवणारा व्यक्ती त्यांच्या ओळखीचा होता. तो सातत्याने जमिनीपासून कमी उंचीवर विमान उडवत होता. त्यांना त्याला अनेकदा खडसावले, पण तो ऐकायला तयार नव्हता. त्यांनी वैमानिकाला फुटबॉल मारुन विमान खाली पाडण्याचा इशाराही दिला होता. अखेर 1957 च्या फेब्रुवारीमध्ये वैमानिक परत विमान कमी उंचीवर उडवत होता.
राहिल्या फक्त आठवणी
यानंतर चिडलेल्या रॉबर्टो यांनी फुटबॉलला इतकी जोरात किक मारली की, तो सरळ जाऊन विमानाच्या इंजिनला धडकला आणि विमान मोकळ्या मैदानात कोसळले. ही घटना जमिनीपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर घडली. यानंतर विमान अपघातामुळे ते अस्वस्थ झाले, पण पायलट सुखरूप असल्याचे समजल्यावर त्यांच्या जीवात जीव आला. आता जनरल जीन्स क्लब राहिलेला नाही, पण त्याचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत.