बोंबला! पासपोर्टच्या फाटलेल्या पानांमुळे पतीचं पितळ पडलं उघडं, विमानतळावरच पत्नीचं तांडव
By अमित इंगोले | Published: November 23, 2020 11:33 AM2020-11-23T11:33:07+5:302020-11-23T11:35:27+5:30
ही व्यावसायिक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुबईला जाण्यासाठी आयजीआय केटी-३ एअरपोर्टवर आली होती. जाण्याच्या तयारीत इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट चेक करत होते.
आपल्याच काही चुकांमुळे पतीचं पत्नीसमोर बिंग फुटल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील. मात्र, नवी दिल्लीतील आयजीआय केटी-3 एअरपोर्टवर घडलेली अशीच एक घटना चर्चेचा विषय ठरत आहे. इथे एक उद्योगपती पत्नीसोबत दुबईला निघाला होता. पण पासपोर्टमधील फाटलेल्या पानांमुळे सगळाच गोंधळ झाला. या फाटलेल्या पानांमुळे पत्नीसमोर पतीचा कारनामा समोर आला आणि यावरून दोघांमध्ये एअरपोर्टवरच खटके उडाले. चेकिंगदरम्यान हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं मोठा गोंधळ उडाला.
ही व्यावसायिक व्यक्ती आपल्या पत्नीसोबत दुबईला जाण्यासाठी आयजीआय केटी-३ एअरपोर्टवर आली होती. जाण्याच्या तयारीत इमिग्रेशन अधिकारी त्यांचा पासपोर्ट चेक करत होते. मात्र, व्यावसायिकाच्या पासपोर्टमधील सुरूवातीची दोन पाने फाटलेली दिसली. अधिकाऱ्यांनी लगेच चौकशी देखील केली. याबाबत विचारणा करण्यात आल्यावर व्यावसायिकाने मला याबाबत माहीत नाही, अशी उडवा उडवीची उत्तरं पत्नीसमोर दिली. आता आपलं बिंग फुटणार हे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने इमिग्रेशन अधिकाऱ्यांना बाजूला घेऊन मी सगळं सांगतो फक्त पत्नीसमोर नको, असा विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला. हे समजताच पत्नीने तिथे गोंधळ सुरू केला.
पत्नी हट्टाला पेटली की, जी चौकशी करायची आहे आणि जे सांगायचं ते माझ्यासमोर सांगा. मी इथून बाहेर जाणार नाही, असं सांगत पत्नीने तिथेच गोंधळ सुरू केला. पुढे चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. चौकशीतून समोर आलं की, हा व्यावसायिक पती याआधी दोन वेळा पत्नीला न सांगता थायलंड टूरवर गेला होता. एकदा तो बनारसहून थायलॅंड आणि दुसऱ्यांदा कोलकाताहून थायलँडला गेल्याचं उघड झालं.
आता या पतीचा हा कारनामा समोर आल्यावर पत्नी संतापली आणि तिने पतीसोबत दुबईला जाण्यास देखील नकार दिला. पत्नीला कळू नये म्हणून पतीनं पासपोर्टची पाने फाडली होती. मात्र त्याचा हा प्लॅन सर्वांसमोर उघड झाला. आता पासपोर्टसोबत छेडछाड केल्याप्रकरणी व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक दोनवेळा थायलंडला कशासाठी आणि कुणासोबत गेला होता हे समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे.