जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 08:11 AM2024-07-03T08:11:34+5:302024-07-03T08:11:55+5:30
ब्राझीलमधील पावलो गॅब्रियल ऊर्फ सिल्वा बरोस आणि काटूसिया ली होशिनो यांनी प्रेमाच्या बळावरच जगात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.
त्या दोघांनी एकमेकांमध्ये काय पाहिलं, असा प्रश्न अनेक जोडप्यांना पाहून लोक विचारतात. पण, जगाच्या या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्या दोघांना ना फुरसत असते ना इच्छा. एकमेकांची सोबत करत लोकांच्या अशा प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करण्याची ताकद त्यांच्यात आलेली असते. एकमेकांची निवड करण्यापासून ते जगातल्या नकारात्मक प्रतिक्रियांना झेलण्यापर्यंत, एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची ताकद बनण्यापर्यंतचा प्रवास प्रेमाच्या बळावरच झालेला असतो.
ब्राझीलमधील पावलो गॅब्रियल ऊर्फ सिल्वा बरोस आणि काटूसिया ली होशिनो यांनी प्रेमाच्या बळावरच जगात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं म्हणून आज त्यांना जग ओळखतं. २००६ मध्ये हे दोघे जण समाज माध्यमांवर एकमेकांना भेटले. सहज म्हणून दोघांनी एकमेकांना मेसेजेस केले. पावलोने काटूसियाला ऑनलाइनच पाहिलं. जेव्हा पाहिलं तेव्हापासून पावलोला काटूसियाबद्दल काहीतरी विशेष वाटू लागलं. सुरुवातीला काटूसियाला पावलो हा अतिशय बोअर माणूस आहे, असं वाटायचं. तिला पावलोने तिच्यावर केलेल्या काही कमेंटसही आवडायच्या नाहीत. शेवटी त्याच्या एका कमेंटमुळे काटूसियाच्या मनात पावलोबद्दल खटकी पडलीच. तिने पावलोला समाज माध्यमावर ब्लाॅक करून टाकलं. तब्बल १८ महिने पावलो आणि काटूसियाचा ऑनलाइन काहीच संपर्क नव्हता.
सगळं संपल्यातच जमा होतं तोच १८ महिन्यांनंतर काटूसिया समाज माध्यमावरून पावलोशी परत बोलू लागली. बोलता बोलता दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले, दोघं प्रत्यक्ष एकमेकांना भेटले आणि मग त्यांच्यातलं प्रेम घट्ट होत गेलं. दोन वर्षे ऑनलाइन एकमेकांशी चॅटिंग केल्यानंतर २००८ मध्ये ते एकमेकांना प्रत्यक्ष भेटले. नंतर पुन्हा आपआपल्या शहरात निघून गेले. हे दुरून एकमेकांवर प्रेम त्यांनी खूप काळ केलं. पण, नंतर आता आपण एकमेकांच्या जवळ असायला हवं, सोबत असायला हवं, असं दोघांनाही वाटू लागलं. काटूसिया लाॅण्ड्रिना हे आपलं शहर सोडून पावलोच्या इटापेव्हा शहरात राहायला आली. नंतर पावलोने एका रेस्टाॅरण्टमध्ये औपचारिकरीत्या काटूसियापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. ही गंमत नसून पावलो हे आपल्याला गांभीर्यानं विचारतो आहे याची खात्री पटल्यावर काटूसियानेही लगेच होकार दिला.
एक उंची सोडलं तर आपणही इतर सामान्य जोडप्यांप्रमाणे जगू शकतो, असा दोघांना विश्वास वाटला आणि त्या दोघांनी २०१६ मध्ये लग्न केलं. आज गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये पावलो आणि काटूसिया यांची ‘जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं’ म्हणून नोंद झाली आणि दोघेही असामान्य झालेत. ‘द जीनिअस’ या विश्वविक्रम नोंदविणाऱ्या संस्थेनेदेखील त्यांची दखल घेतली आहे. लग्नानंतर पावलो आणि काटूसियात अनेक गोष्टींवरून वाद झाले. काटूसियाचा स्वभाव संतापी तर पावलो मात्र शांत आणि समजूतदार. खरं तर या विरोधामुळेच त्यांचं नातं टिकलं आणि घट्टही झालं. पावलोला काटूसियासोबतची आपली जोडी जगातली एकमेव जोडी वाटते. काटूसिया पावलोला सर्व गोष्टीत समजून घेते, आधार देते. तिच्या संघर्ष करत तगून राहण्याच्या स्वभावामुळे पावलो तिला ‘लिटील वाॅरियर’ म्हणतो.
पावलो हा इटापेव्हा येथील स्थानिक सरकारच्या प्रशासनात नोकरी करतो तर काटुसियाचं स्वत:चं ब्युटी पार्लर आहे. २१ व्या वर्षापर्यंत पावलोला नीट चालताही येत नव्हतं. तो लहान मुलांच्या सायकलवरून फिरायचा. नंतर त्याने स्वत:साठी खास वेगळी अशी दुचाकी बनवून घेतली. पावलोने आता चारचाकी वाहनदेखील शिकून घेतलं आहे. पावलो आणि काटूसिया दोघेही एकमेकांच्या आधाराने उभे आहेत. एकमेकांना प्रोत्साहन देत आपआपल्या आयुष्यात पुढे जात स्वतंत्र ओळख तयार करत आहेत. पण, दोघांनाही समान खंत वाटते की जगाला कुतूहल फक्त त्यांच्या कमी उंचीचच वाटतं. आपल्यातील प्रेमाने आयुष्य ताकदीनं जगण्याचं बळ दिलं. पावलो आणि काटूसियाने एकमेकांच्या सोबतीनं नात्यात आणि आयुष्यात खूप पुढे जाण्याचा निर्धार केला आहे. हे सर्व आपल्या उंचीच्या पलीकडे जाऊन जगानं बघावं असं दोघांनाही वाटतं.
उंची नको, प्रेम बघा!
पावलोची उंची ९०.२८ सेंमी आहे तर काटूसियाची उंची ९१.१३ सेंमी आहे. ती केवळ एक सेंटिमीटरने पावलोपेक्षा उंच आहे. या दोघांची मिळून उंची १८१.४१ सेंटिमीटर असल्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डने केली आहे. आमची उंची भलेही कमी असेल; पण, आमचं हृदय खूप मोठं आहे. “आमची उंची नको, प्रेम बघा!” असं आवाहन पावलो आणि काटूसिया करतात. सुरुवातीला दोघांनाही लोकांच्या विचित्र नजरांचा, टोमण्यांचा सामना करावा लागला. पण, आज लोकांची त्यांच्याकडे पाहण्याची नजर बदलली आहे.