ही आहे भारतातील सर्वात कमी उंचीच वकिल, कधी लोक उडवत होते तिची खिल्ली!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:27 PM2021-03-30T12:27:36+5:302021-03-30T12:31:10+5:30
या तरूणीला बालपणापासून तिच्या उंचीमुळे अनेक टोमणे ऐकावे लागले होते. पण तिने तिच्या मेहनतीने असं काही मिळवलं की, लोकांची तोंडं आपोआप बंद झालीत.
आज आपण २१ व्या शतकात जगत आहोत. पण भारतात आजही लोक धर्म-जात, रंग आणि उंचीवरून भेदभाव करतात. कुणाचा रंग किंवा उंची बघून नाही तर त्याच्यातील चांगल्या गोष्टी बघून त्याला स्वीकारलं पाहिजे हे कुणाला कळतंच नाही. आज आम्ही तुम्हाला एका महिलेची यशोगाथा सांगणार आहोत. या तरूणीला बालपणापासून तिच्या उंचीमुळे अनेक टोमणे ऐकावे लागले होते. पण तिने तिच्या मेहनतीने असं काही मिळवलं की, लोकांची तोंडं आपोआप बंद झालीत.
आम्ही सांगतोय पंजाबच्या जालंधर कोर्टातील वकिल २४ वर्षीय हरविंदर कौर उर्फ रूबीबाबत. जालंधरच्या रामामंडीमध्ये राहणाऱ्या हरविंदरची उंची ३ फूट ११ इंच आहे. ती भारतातील सर्वात कमी उंचीची वकिल आहे. हरविंदरला तिच्या उंचीमुळे खूपकाही ऐकावं लागलं होतं. मात्र, आज लोक तिच्या उंचीचं नाही तर तिच्या यशाची उदाहरणे देतात.
एअर होस्टेस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं
हरविंदर कौरने सांगितले की, तिला बालपणापासून एअर होस्टेस व्हायचं होतं. पण कमी उंचीमुळे तिचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. यादरम्यान तिच्या कुटुंबियांनी तिच्या स्लो ग्रोथमुळे तिला अनेक डॉक्टरांकडे दाखवले. अनेक उपचार केले, मेडिटेशन केलं. पण काही फायदा झाला नाही.
सोशल मीडियातून मिळाली मदत
हरविंदर कौर सांगते की, मी १२ वी ची परीक्षा दिल्यावर दिवसभर मोटिवेशन व्हिडीओ बघत होते. या व्हिडीओतून मला हिंमत मिळाली. नंतर मी हे मान्य केलं की, देवाने मला जसं बनवलं आहे ते मी स्वीकारलं पाहिजे. त्यानंतर सोशल मीडियातील लोकांकडूनही मला भरपूर प्रेम मिळालं. ज्याने माझी हिंमत वाढली. अनेकदा सोशल मीडियावर अनेक वाईट कमेंटही आल्या. पण त्याकडे मी दुर्लक्ष केलं.
मनात येत होते आत्महत्येचे विचार
ती म्हणाली की, गल्लीपासून ते शाळेपर्यंत तिची खिल्ली उडवली जात होती. एक वेळ अशी होती की, लोकांचे टोमणे ऐकून तिने स्वत:ला एका खोली बंद करून घेतलं होतं. यादरम्यान तिच्या डोक्यात अनेकदा आत्महत्येचे विचार आले होते. मात्र, कॉलेजमध्ये गेल्यावर तिच्या आयुष्यात खूप बदल झाला. ती सकारात्मक विचार करू लागली होती.
मोठ्या मेहनतीने वकिल झाली
हरविंदरला कमी उंचीमुळे नेहमीच लोकांचे टोमणे ऐकावे लागत होते. १२वी नंतर तिने कायद्याच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा निश्चय केला. लॉ चं शिक्षण केल्यावर ती वकिल झाली. आता न्यायाधीश होण्याचं तिचं स्वप्न आहे.
हरविंदरचे वडील शमशेर सिंह फिल्लोर ट्रॅफिक पोलिसात ASI आहेत आणि आई सुखदीप कौर एक हाउसवाइफ आहे. हरविंदरने गेल्यावर्षी तिचं LLB चं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २३ नोव्हेंबरला तिने बार काउन्सिल ऑफ पंजाब अॅन्ड हरयाणाकडून लायसन्स मिळवलं. ती आता जालंधर कोर्टात क्रिमिनल केसेस हॅंडल करते.