विकृत ! 90 वर्षाच्या आईला अंगावर कपडाही घालू न देता सोडलं वा-यावर
By admin | Published: April 12, 2017 04:34 PM2017-04-12T16:34:14+5:302017-04-12T16:45:33+5:30
तेलंगणात राहत असलेल्या सेवानिवृत्त हेडमास्टर राम वेंकट नरसैया यांनी आपल्या 90 वर्षीय आईला घरात कोंडून ठेवलं होतं
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 12 - स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी...या म्हणीचा प्रत्यय ज्याला कधीच आईचं प्रेम मिळालं नाही त्याला नक्कीच आला असेल. पण ज्यांना आईची माया मिळते अनेकदा त्यांना याची किंमत कळतच नाही. अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये मुलाने आपल्या 90 वर्षीय म्हाता-या आईला घरात अत्यंत दयनीय अवस्थेत ठेवलं होतं. त्या माऊलीची ती परिस्थिती पाहून कोणाचाही मायेचा पाझर फुटेल, मात्र तिच्या मुलाला याचं अजिबात काहीच वाटलं नाही. तेलंगणामधील करीमनगर जिल्ह्यातील ही घटना आहे.
तेलंगणात राहत असलेल्या सेवानिवृत्त हेडमास्टर राम वेंकट नरसैया यांनी आपल्या 90 वर्षीय आईला घरात कोंडून ठेवलं होतं. त्यांना अत्यंत दयनीय अवस्थेत ठेवण्यात आलं होतं. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने यासंबंधी माहिती मिळाली. ही माऊली आपल्या घरातल्या बाल्कनीत भर उन्हात अर्धनग्न अवस्थेत असहाय्य अवस्थेत पडली होती.
कारवाई करण्यासाठी जेव्हा पोलीस राम वेंकट यांच्या घरी पोहोचले तेव्हा तर सुरुवातीला त्यांनी दरवाजा खोलण्यास नकार दिला. पण नंतर पोलिसांनी जबरदस्तीने दरवाजा उघडण्यास भाग पाडलं. पोलीस अधिका-यांनी अगोदर या आईसाठी साडी आणली. पोलिसांनी ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा 2007 अंतर्गत राम वेंकटविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महसूल विभाग अधिकारी बीएसव्ही प्रताप यांनी "कुटुंबाचं समुपदेश केलं जाईल. तसंच वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात ठेवलं जाईल, तिचा होणारा खर्च मुलाच्या पेंशनमधून कापला जाईल", अशी माहिती दिली आहे. वृद्ध महिलेवर सध्या उपचार असून रुग्णालयात भर्ती आहे.