तब्बल ४० वर्षांनंतर सापडलं पाळीव कासव, अडगळीच्या खोलीत १९८२ सालापासून मुक्कामाला होतं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 08:20 PM2022-06-09T20:20:19+5:302022-06-09T20:31:53+5:30

एका कुटुंबाचं पाळीव कासव सुमारे ४० वर्षांपूर्वी हरवलं होतं. खूप शोधाशोध करूनही कासव (Tortoise) सापडलं नाही, त्यामुळे त्यांनी त्याला शोधणं थांबवलं होतं.

pet tortoise found after 40 years in room family is shocked | तब्बल ४० वर्षांनंतर सापडलं पाळीव कासव, अडगळीच्या खोलीत १९८२ सालापासून मुक्कामाला होतं

तब्बल ४० वर्षांनंतर सापडलं पाळीव कासव, अडगळीच्या खोलीत १९८२ सालापासून मुक्कामाला होतं

Next

अनेकदा असं होतं की आपण आपली हरवलेली वस्तू बऱ्याच ठिकाणी शोधतो, पण ती आपल्याला आपल्या नजरेसमोर कुठेतरी सापडते. म्हणजे आपल्या नजरेसमोर असलेली गोष्ट शोधण्यासाठी अख्खं घर पालथं घालतो. यासाठी ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ अशी एक म्हण मराठीत आहे. दरम्यान, घरात असलेला असाच एक जीव एका कुटुंबाने दूरदूरपर्यंत शोधल्याचा एक प्रकार ब्राझीलमधील (Brazil) रिओतून समोर आला आहे. येथे राहणाऱ्या एका कुटुंबाचं पाळीव कासव सुमारे ४० वर्षांपूर्वी हरवलं होतं. खूप शोधाशोध करूनही कासव (Tortoise) सापडलं नाही, त्यामुळे त्यांनी त्याला शोधणं थांबवलं होतं.

१९८२ मध्ये हरवलेलं कासव आता तब्बल ४० वर्षांनी या कुटुंबाला परत सापडलं आहे. महत्त्वाचं म्हणजे कासव त्यांना घराच्या तळघरामधील अडगळीच्या खोलीत सापडलं. मॅन्युएला असं या कासवाचं नाव आहे. बराच शोध घेऊनही कासव न सापडल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध न घेण्याचा निर्णय घेतला आणि काही काळानंतर हे कुटुंब दुसऱ्या घरात राहण्यास निघून गेलं. परंतु, अलीकडेच घरातील एका व्यक्तीचं निधन झाल्यावर हे कुटुंब त्यांच्या वडिलोपार्जित घरी परतलं. त्यानंतर एकेदिवशी त्यांनी बेसमेंटमधील (Basement) या अडगळीच्या खोलीची साफसफाई सुरू केली आणि तेव्हा त्यांना ४० वर्षांपूर्वी हरवलेलं हे कासव तिथं जिवंत दिसलं.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, १९८२ मध्ये हे कासव अचानक गायब झालं. एकेदिवशी काही कामगार त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता. त्यामुळे तेव्हा ते कासव बाहेर निघून गेलं असावं, असं कुटुंबीयांना वाटलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी या कासवाचा शोध घेतला; पण त्यांना कासव सापडलं नव्हतं. या कुटुंबाने सगळीकडे कासवाचा शोध घेतला; पण घरात शोधलं नाही. शेवटी शोध घेऊन निराश झालेल्या कुटुंबीयांनी कासव सापडणार नाही, असं समजत शोध थांबवला. तब्बल ४० वर्षांनी हे कासव अडगळीच्या खोलीत जिवंत सापडल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

ही घटना जेव्हा या कुटुंबाने लोकांशी शेअर केली तेव्हा सगळ्यांना एवढंच जाणून घ्यायचं होतं की कासव इतकी वर्षं कसं जगलं? इतकी वर्षं घराच्या तळघरातील लाकडावरील वाळवी खाऊन कासव जिवंत असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, कुटुंबीयांनी तातडीने कासवाची तपासणी करून घेतली आहे. आधी ती मादी कासव असल्याचं कुटुंबीयांना वाटत होतं मात्र तपासणीनंतर तो नर असल्याचं कळालं. त्यामुळे त्यांनी त्याचं नावही बदललं. खरं तर कासवं दीर्घायुषी असतात आणि ते सुमारे 225 वर्षं जगू शकतात. मात्र पाणी आणि अन्नाशिवाय ती फक्त तीन वर्षंच जगू शकतात. हे कासव तब्बल 40 वर्षं अन्न-पाण्याशिवाय जगल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

Web Title: pet tortoise found after 40 years in room family is shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.