दिव्यांग तरुणी जिद्दीनं चालवतेय रिक्षा; कारण वाचून लेकीबद्दलचा आदर वाढेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 12:11 PM2020-01-04T12:11:27+5:302020-01-04T12:29:24+5:30
महिलांना ऑटोरिक्षा चालवताना, कॅब चालवताना किंवा बस चालवताना तुम्ही पाहिलं असेलच. या महिलांबद्दल तुमच्या मनात सन्मानाची भावनाही आली असेल.
महिलांना ऑटोरिक्षा चालवताना, कॅब चालवताना किंवा बस चालवताना तुम्ही पाहिलं असेलच. या महिलांबद्दल तुमच्या मनात सन्मानाची भावनाही आली असेल. पण काही असेही लोक आहेत जे या महिलांना त्यांच्या कामावरून जज करतात. कारण आजही हे काम केवळ पुरूषांचं समजलं जातं. पण या विचाराला छेद देणाऱ्या कितीतरी महिला आज आहेत. अशीच एक महिला आहे ३५ वर्षीय अंकिता शाह.
अंकिता शाह ही अहमदाबादमध्ये ऑटोरिक्षा चालवते आणि ती अहमदाबादमधील पहिली दिव्यांग रिक्षावाली आहे. एका कॉल सेंटरमधील आपली आरामदायी नोकरी सोडून अंकिता गेल्या तीन महिन्यांपासून रिक्षा चालवतीये. हा निर्णय अंकिता तिच्या कॅन्सर पीडित वडिलांच्या उपचारासाठी घेतला आहे.
(Image Credit : Social Media)
अकिंता घरातील सर्वात मोठी मुलगी असून तिने अर्थशास्त्रातून पदवी मिळवली आहे. बालपणीच पोलिओने तिला शिकार केले त्यामुळे तिचा उजवा पाय कापावा लागला. समाजाच्या अनेक गोष्टींची शिकार अंकिता २०१२ मध्ये अहमदाबादला आली आणि कॉल सेंटरला नोकरी करू लागली होती.
अंकिताने सांगितले की, '१२ तासांची शिफ्ट केल्यावर मला मोठ्या मुश्कीलीने १२ हजार रूपये मिळायचे. वडिलांना कॅन्सर झाल्याचं कळालं तेव्हा मला पुन्हा पुन्हा अहमदाबादहून सुरताला जावं लागायचं आणि सुट्टया घेण्यातही अडचण येत होती. पैसेही जास्त मिळत नव्हते. मग मला नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला'.
त्यानंतर इतरही काही कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतरही अंकिताला नोकरी मिळत नव्हती. कंपन्यांसाठी तिचं दिव्यांग असणं जास्त अडचणीचं होतं. यावर ती सांगते की, 'तो काळ फारच त्रासदायक होता. आमचं घर चालवणं कठिण होत होतं आणि मला वडिलांच्या उपचारासाठी मदत करत येत नसल्याचं वाईटही वाटत होतं. त्यामुळे मी माझ्या भरोशावर काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
रिक्षा चालवण्याचा निर्णय अंकितासाठी सोपा तर नव्हताच, सोबतच तिच्या परिवारासाठीही सोपा नव्हता. पण आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अंकिताने काम आणि खाजगी जीवनात बॅलन्स ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला.
ती सांगते की, 'मी रिक्षा चालवणं मित्रांकडून आणि लालजी बारोट यांच्याकडून शिकले. तो दिव्यांग आणि रिक्षाही चालवतो. त्याने मला रिक्षा चालवणे तर शिकवलेच सोबतच कस्टमाइज्ड रिक्षा मिळवून देण्यासही मदत केली'.
आता अंकिता ८ तास रिक्षा चालवते आणि महिन्याला २० हजार रूपयांपर्यंत कमाई करते. अंकिताला भविष्यात टॅक्सी बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे.