कमालच! पृथ्वीवरील एक असं गाव जिथे आजपर्यंत कधीच पडला नाही पाऊस, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:56 PM2024-11-16T12:56:23+5:302024-11-16T13:03:03+5:30
जगात एक असंही ठिकाण आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही. यामागचं कारणही खास आहे.
Worlds Driest Village: पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटत असतो. पावसाच्या सरी जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा एक वेगळंच वातावरण तयार होतं. काही ठिकाणी खूप पाऊस पडतो तर काही ठिकाणी कमी. मात्र, जगात एक असंही ठिकाण आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही. यामागचं कारणही खास आहे.
जगात काही अशी ठिकाणं आहेत जिथे कमी पाऊस पडतो. पण जिथे कधीच पाऊस पडत नाही असं एक गाव यमनमध्ये आहे. अल-हुतेब असं या गावाचं नाव आहे. या गावात आजपर्यंत एक थेंबही पाऊस पडला नाही. तरी सुद्धा हे गाव आपल्या सैौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटक इथे येऊन आनंद घेतात. पण ते या गोष्टीनेही अवाक् होतात कारण इथे कधीच पाऊस पडत नाही.
हे गाव यमनची राजधानी सनापासून काही अंतरावर आहे. अल-हुतेब गाव हे एका डोंगरावर वसलेलं आहे. हिवाळ्यात इथे खूप जास्त थंडी पडते. तर उन्हाळ्यात इथे उन्हाचा तडाखाही जास्त असतो.
या गावात कधीच पाऊस न पडण्याचं कारण म्हणजे या गावाची उंची. 'अल-हुतेब' गाव समुद्र तळापासून 3,200 मीटर उंचीवर आहे. सामान्यपणे ढग २ हजार मीटरच्या उंचीवर तयार होतात. ढग या गावाच्या खूप खाली असतात. याच कारणाने पावसाचे थेंब इथपर्यंत येतच नाहीत. त्यामुळे गाव कोरडंच राहतं.
इथे कधीच पाऊस पडत नाही तरी सुद्धा इथे पर्यटकांनी मोठी गर्दी असते. येथील गावाचं लोकेशन आणि ऐतिहासिक वास्तुकला लोकांना आकर्षित करते. गावातील घर प्राचीन आणि आधुनिक कलेचं मिश्रण आहेत.
या गावात राहणारे जास्तीत जास्त लोक हे अल-बोहरा किंवा अल-मुकरमा समाजाचे आहेत. इथे वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृती बघायला मिळतात. इथे पाऊस भलेही पडत नसेल, पण लोक या ठिकाणाला स्वर्ग मानतात.