10 मिनिटे विमानाचा संपर्क तुटला, अधिकाऱ्यांना वाटलं हायजॅक झालं; नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 05:01 PM2022-05-30T17:01:12+5:302022-05-30T17:01:22+5:30
काही हजार फूट उंचीवर असलेल्या विमानाला ऑटोपायलट मोडवर टाकून दोन्ही पायलट झोपी गेल्याची घटना घडली आहे.
तुम्ही विमान अपघाताच्या अनेक घटना वाचल्या असतील. नुकतेच नेपाळमध्ये एका विमानाचा अपघात होऊन 22 जणांचा मृत्यू झाला. यातच आता प्रवाशांनी भरलेले विमान उडवत असताना पायलटला झोप लागल्याची घटना घडली आहे. पायलट झोपल्यामुळे 10 मिनिटे विमानाशी संपर्क झाला नाही. यावेळी अधिकाऱ्यांना दहशतवादी हायजॅकची भीती वाटली आणि फायटर जेटही तयार करण्यात आले.
इटलीमधील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इटलीचे आहे. पायलट इटलीच्या स्टेट एअरलाइन्समध्ये काम करतो. इटालियन वृत्तपत्र Repubblica च्या मते, ITA Airways AZ609 पॅसेंजर फ्लाइटचे दोन्ही पायलट 30 एप्रिल रोजी न्यूयॉर्क ते रोमला जात असताना एअरबस 330 चे नियंत्रण करत असताना झोपी गेले होते.
हायजॅक झाल्याची भीती
टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार, विमानाचा सह-वैमानिक विश्रांती घेत होता, त्यावेळी दुसऱ्या वैमानिकाकडे विमानाची जबाबदारी होती. पण, दुसऱ्या पायलटने विमान ऑटोपायलटवर टाकले आणि झोपी गेला. यावेळी 10 मिनिटे पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलचा संपर्क झाला नाही. अनेक प्रयत्न करुनही संपर्क न झाल्याने अधिकाऱ्यांना विमान हायजॅक झाल्याची भीती वाटली.
लढाऊ विमाने तयार केली
यानंतर अधिकार्यांनी दोन लढाऊ विमानांना स्टँडबाय ठेवण्यास सांगितले. यादरम्यान अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर 10 मिनिटांच्या प्रयत्नानंतर वैमानिकाने प्रतिसाद दिला. विमान सुखरुप लँड झाल्यानंतर आयटीए एअरवेजच्या अंतर्गत तपासात कॅप्टनवर ठपका ठेवत त्यांना काढून टाकण्यात आले.