'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान', पु.ना. गाडगीळच्या जाहिरातीवर सोशल मीडियातून टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 05:35 PM2017-07-29T17:35:49+5:302017-07-29T17:37:51+5:30
पु.ना. गाडगीळच्या या जाहिरातीवर अनेकांनी रोष व्यक्त केला असून महिलांनी तर थेट नाराजी व्यक्त करत टिकास्त्रच सोडलं आहे
मुंबई, दि. 29 - सध्या सोशल मीडियावर पु.ना. गाडगीळच्या एका जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगली आहे. पु.ना. गाडगीळच्या या जाहिरातीवर अनेकांनी रोष व्यक्त केला असून महिलांनी तर थेट नाराजी व्यक्त करत टिकास्त्रच सोडलं आहे. ही जाहिरात आहे मंगळसूत्राची. 'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान' या टॅगलाईनसहित ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी या जाहिरातीचे बॅनर्सही लागलेले पहायला मिळत आहेत. जुने विचार मांडणा-या पु.ना. गाडगीळला अजूनही फक्त मंगळसूत्रच आपला अभिमान आहे असं वाटतं का ? असे सवाल महिलावर्गाकडून विचारले जात आहेत.
पु.ना. गाडगीळ हे नाव तसं काही नवं नाही. अनेकजण दागिने विकत घेताना पु.ना. गाडगीळला पसंती देतात. मात्र यावेळी एका भलत्याच कारणासाठी पु.ना. गाडगीळ महिलावर्गात चर्चेला आला आहे. पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सतर्फे मंगळसूत्र महोत्सव घेण्यात येत आहे. २४ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाची जाहिरात करताना 'माझे मंगळसूत्र माझा स्वाभिमान' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे.
महिला वर्गात अजूनही मंगळसूत्राला तितकंच महत्वं आहे. आपली परंपरा आणि संस्कृती दर्शवणारा दागिना म्हणून मंगळसूत्र वापरलं जातं. जुन्या काळातील महिला अजूनही मंगळसूत्राला तितकंच महत्व देत असून सौभाग्याचं लेणं म्हणून जपत असतात. पण आजच्या पिढीतील तरुणी किंवा महिलांबद्दल बोलायचं झाल्यास त्यांना हे मान्य नाही. मंगळसूत्र इतर दागिन्यांप्रमाणे एक दागिना असून त्याचं महत्व अमान्य नाही. पण मंगळसूत्राला स्वाभिमान म्हणणं त्यांना पटत नाही. काही महिलांनी आम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आत्मविश्वासाने वावरत असताना अद्यापही जुन्या परंपरांमध्ये का अडकवत आहात असा सवाल विचारला आहे. तर काहींनी आत्मविश्वास हा स्त्रीचा स्वाभिमान असल्याचं मतं व्यक्त केलं आहे.
सोशल मीडियावर पु.ना.गाडगीळच्या जाहिरातीवर टीका होत आहे. परंतु, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ यांनी मात्र जाहिरातीतील उल्लेखाचा समर्थन केलं असल्याची माहिती आहे.