नवरदेवाला लग्न मंडपातून उचलून घेऊन गेले पोलीस, जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 01:20 PM2023-04-27T13:20:41+5:302023-04-27T13:22:20+5:30
इथे नवरदेवाला एका तरूणीची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्याच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या लग्नाच्या दिवशीच लग्न मंडपातून अटक केली.
Groom Caught By Police: सोशल मीडियावर लग्नासंबंधी अनेक वेगवेगळ्या अजब घटना समोर येत असतात. नवरदेव-नवरीची एन्ट्री, त्यांचा डान्स नेहमीच चर्चेत असतो. तर कधी कधी लग्नातील जेवणावरून, मानपानावरून झालेली भांडणं चर्चेत असतात. पण एका लग्नात एक अशी घटना घडली जी बघून सगळेच हैराण झाले. नवरदेव लग्न मंडपात बसला होता, अचानक पोलीस आले आणि त्याला पकडून घेऊन गेले.
ओडिशाच्या भुवनेश्वरमधील ही घटना आहे. इथे नवरदेवाला एका तरूणीची फसवणूक केल्याचा आरोप होता. त्याच्या विरोधात तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या लग्नाच्या दिवशीच लग्न मंडपातून अटक केली.
ही घटना बरगढ़ जिल्ह्याच्या बेहेरापल्ली गावातील आहे. नवरदेवाचं नाव अजीत कुमार भोई आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरूणीने अजीतवर लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप लावला आहे आणि तिने भुवनेश्वर महिला पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली होती.
पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांच्या एका टीमने लग्न मंडपात प्रवेश केला आणि रितीरिवाज करत असलेल्या नवरदेवाला उचलून नेलं. तेव्हा उपस्थित पाहुण्यांना चांगलाच धक्का बसला.
ओडिशाच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी नवरदेवाकडून एक सोन्याची चेन, अंगठी आणि एक घड्याळ ताब्यात घेतलं आणि ते परिवाराकडे सोपवलं. नवरीकडील लोकांनी अजीतला हुंड्यात देण्यात एक कार खरेदी केली आहे. पोलिसांनी नवरदेवाचं मेडिकल करून त्याला कोर्टात हजर केलं आहे.