मुंबईत रस्त्यावर 'पोकेमॉन गो' खेळण्यास पोलीस बंदीची शक्यता

By admin | Published: July 26, 2016 09:25 AM2016-07-26T09:25:38+5:302016-07-26T10:29:47+5:30

गेम लाँच झाल्यानंतर निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी 'पोकेमॉन गो' विरोधात कंबर कसली असून मुंबईतल्या रस्त्यांवर हा खेळ खेळण्यास बंदी येऊ शकते

The possibility of police ban to play 'Pokémon Go' on the street in Mumbai | मुंबईत रस्त्यावर 'पोकेमॉन गो' खेळण्यास पोलीस बंदीची शक्यता

मुंबईत रस्त्यावर 'पोकेमॉन गो' खेळण्यास पोलीस बंदीची शक्यता

Next
ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 26 - सध्या सोशल मिडियावर पोकेमॉन गो गेमबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे. भारतामध्ये अजून हा गेम लाँच झालेला नसतानाही त्याचे वेड तरुणाईला लागलं आहे. त्यामुळे गेम लाँच झाल्यानंतर निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी अगोदरच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सतत मोबाईलमध्ये पाहत गेम खेळताना देहभान विसरणा-या अतिउत्साही लोकांमुळे मुंबईत धोके आणि अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी 'पोकेमॉन गो' विरोधात कंबर कसली असून मुंबईतल्या रस्त्यांवर हा खेळ खेळण्यास बंदी येऊ शकते.
 
 
मुंबईत अगोदरच असलेली वाहतुकीच्या समस्येमुळे मुंबईकरांसोबत पोलीसही हैराण आहेत. अशा परिस्थितीत मुंबईच्या रस्त्यांवर पोकेमॉन पकडण्यासाठी गेमर्स उतरले तर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवले जातील.  त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीनेच कठोर नियमावली आखण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी यासंबंधी ट्विटरवरुन एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. 

'पोकेमॉन गो' खेळताना अपघात झाल्यास मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. गेम खेळताना सतत मोबाईलमध्ये पाहत असल्याने समोर किंवा आजूबाजूला दुर्लक्ष होतं, ज्यामुळे अपघाताची शक्यता असते. हे टाळण्यासाठी मुंबई पोलीस ट्विटरसारख्या सोशल मीडियावरुन जनजागृती करणार आहे. गेम खेळणाऱ्यांसाठी कठोर नियमावलीही आखण्यात येणार आहे. ही नियमावली अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी पोकेमॉन गो भररस्त्यात किंवा गर्दीच्या ठिकाणी खेळण्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात, अशी माहिती आहे.
 

काय आहे पोकेमॉन गो?

नितांदो या जपानी कंपनीने हा खेळ विकसित केला असून, पोकेमॉन गो असे या खेळाचे नाव आहे. या कंपनीने आठवडाभरापूर्वी हा खेळ विकसित केला आहे. हा खेळ भारतात अधिकृतरीत्या उपलब्ध झाला नसला, तरीही पायरेटेड व्हर्जन या अ‍ॅप्सद्वारे हा खेळ मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येतो. इंटरनेटद्वारे पोकेमॉन गो हा खेळ खेळता येत असून, पोकेमॉन गोला शोधता येते.

या खेळामधील पोकेमॉन गोला शोधण्यासाठी ज्या दिशेला पोकेमॉन असण्याची दिशा मिळते. त्या दिशेला तरुणाई मोबाइल घेऊन तरुणाई भरकटते. यामुळे रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या खेळाच्या आहारी गेल्यास मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असून, तरुणांचे अभ्यासाकडेही दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तरुणांनी या खेळाकडे दुर्लक्षच केलेले बरे आहे. - डॉ. किरण गुजर, मानसोपचारतज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय, पिंपरी

कसा खेळायचा पोकेमॉन - 

अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित नीअँटिक या गेमिंग कंपनीने लहान मुलांच्या विश्वातील लोकप्रिय कार्टून मालिकेतील पोकेमॉन या कार्टून कॅरेक्टरला केंद्रस्थानी ठेवून हा गेम तयार केला आहे. हा गेम खेळण्यासाठी आपल्या मोबाइलमधील जीपीएस या तंत्राचा वापर अनिवार्य आहे. जीपीएस यंत्रणा चालू करून हा गेम खेळण्यास सुरुवात करण्यासाठी वापरात असलेला मोबाइल हा हातात घेऊन तुम्हाला प्रत्यक्ष स्वत:हून वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करावी लागते. ही भटकंती चालू असताना तुम्ही प्रत्यक्ष जगात म्हणजेच तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी सध्या कुठे आहात हे या गेममध्ये तपासले जाते आणि हा गेम खेळताना तुमच्या मोबाइलवर ते तुम्हाला जीपीएसच्या माध्यमातून नकाशावर दाखवले जाते. आत्ता हा गेम तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्याच्या आसपास आभासी जगतात तुमच्या मोबाइलवरील नकाशात त्या ठिकाणी पोकेमॉन कुठे लपले आहेत ते तुम्हाला दाखवते; आणि तुम्हाला त्या पोकेमॉनला पोकबॉल या एक चेंडूप्रमाणे दिसणाऱ्या गोष्टीला पोकेमॉनकडे फेकून पोकेमॉनला तुमच्या जाळ्यात पकडावे लागते. या गेमची संरचना अशा प्रकारे केली असल्याने हा गेम एका ठिकाणी किंवा एका विशिष्ट जागेच्या परिघात बसून खेळणे अशक्य आहे. त्यामुळे हा गेम खेळण्यासाठी प्रत्यक्ष घराबाहेर पडणे हे भाग पडते आणि जास्तीतजास्त पोकेमॉन पकडण्यासाठी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जावे लागते. दुसरी बाब अशी की हा गेम एकट्याने जरी खेळावा लागत असला तरी तो खेळणारे इतर लोक हे तुमच्यासोबत स्पर्धा करतात.

Web Title: The possibility of police ban to play 'Pokémon Go' on the street in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.