DJ च्या दणदणाटामुळे ६३ कोंबड्यांचा जीव गेला, भरपाईची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 05:56 PM2021-11-24T17:56:07+5:302021-11-24T17:57:08+5:30
ओदिशामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं 'डीजे'च्या दणदणाटामुळे त्याच्या तब्बल ६३ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी देखील दाखल करुन घेतली आहे.
भुवनेश्वर-
ओदिशामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं 'डीजे'च्या दणदणाटामुळे त्याच्या तब्बल ६३ कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणाऱ्या या व्यक्तीची तक्रार पोलिसांनी देखील दाखल करुन घेतली आहे. पोल्ट्री मालकाच्या दाव्यानुसार त्याच्या गावात आलेल्या एका वरातीत जोरदार आवाजात डीजी वाजत होता. त्यानं आवाज कमी करण्याची विनंती देखील केली होती. पण वरातीत नाचणाऱ्यांनी त्याला अश्लील भाषेत अपमान करुन परत पाठवलं होतं. त्यानंतर त्यानं आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन पाहिलं तर त्याच्या अनेक कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या होत्या.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या माहितीनुसार ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यातील नीलागिरी ठाणे परिसरात कंडागराडी गावात रणजीत परिदा नावाच्या व्यक्तीचा पोल्ट्री व्यवसाय आहे. त्यानं आपल्या तक्रारीत दाखल केलेल्या जबाबानुसार रविवारी रात्री उशीरा एका वरातीत कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे लावला होता. या आवाजाच्या त्रासामुळे ६३ कोंडब्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रणजीत यांनी केला आहे. रात्री जवळपास ११ वाजताच्या सुमारात जोरदार आवाजात डीजे आणि फटाक्यांचा आतषबाजी करत एक वरात गावात आली होती असं तक्रारदारानं तक्रारीत नमूद केलं आहे.
डीजेच्या दणदणाटामुळे कोंबड्यांना त्रास होत असल्याचं रणजीत यांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी वरातीत सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींना याची माहिती दिली होती व आवाज कमी करण्याची विनंती केली होती. पण त्याला अश्लील शब्दांत अपमान करुन तिथून हाकलून लावण्यात आलं होतं, असाही आरोप करण्यात आला आहे. सर्व वऱ्हाडी मंडळी दारुच्या नशेत धुंद होती असंही रणजीत यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रणजीत यांनी झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी केली तेव्हा वराच्या कुटुंबीयांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे रणजीत यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार नोंदवली.