प्रेग्नंट महिलेला टोमणा मारणं बॉसला पडलं महागात; द्यावी लागणार 38 लाखांची नुकसानभरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 09:37 AM2022-03-25T09:37:02+5:302022-03-25T09:38:03+5:30
एका महिलेच्या बॉसने तिला गरोदरपणात खूप टोमणे मारले. यामुळे वैतागलेल्या महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली.
काही ठिकाणी महिलांना कामाच्या जागीस अनेकदा भेदभावाला सामोरं जावं लागतं. काम करताना अनेक महिलांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. अशाच एका प्रकरणात गर्भवती महिलेला काम करताना त्रास देणाऱ्या बॉसला न्यायालयाने लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. ब्रिटनमध्ये एका महिलेच्या बॉसने तिला गरोदरपणात खूप टोमणे मारले. यामुळे वैतागलेल्या महिलेने थेट न्यायालयात धाव घेतली. तिला टोमणे मारल्यामुळे बॉसला तब्बल 38 लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागल्याची घटना आता समोर आली आहे.
चेशायरमधल्या गेलॅटो कॅफेमध्ये ही घटना घडली आहे. तिथे अॅबी नावाची महिला काम करायची. गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात जेव्हा तिला आईस्क्रीम काढण्यासाठी आणि बॉक्स उचलण्यासाठी खाली वाकताना त्रास होऊ लागला, तेव्हा पुरुष कर्मचाऱ्यांनी तिला कामाच्या ठिकाणी टोमणे मारायला सुरुवात केली. याबाबत तिने आपल्या बॉसकडे तक्रार केली असता त्याचे उत्तर ऐकून महिलेला मोठा धक्का बसला.
मिररच्या रिपोर्टनुसार, बेकरी आणि आईस्क्रीमच्या दुकानात काम करणाऱ्या महिलेने खाली वाकून केक उचलण्यास नकार दिला. त्यानंतर सहकारी कर्मचाऱ्याने त्याच्या पत्नीच्या प्रेग्नन्सीचा हवाला देऊन सांगितलं, की त्यानं तिला या स्थितीत काम करू दिलं नसतं. अएबीने याबाबत बॉस फैसल मोहम्मद यांच्याकडे तक्रार केली असता, त्यावर तोडगा काढण्याऐवजी त्याने तिला टोमणे मारले. महिलेचा बॉस म्हणाला, की 'जर ती असं काम करू शकत नसेल, तर तिने दुसरी नोकरी शोधावी. कारण तिला याच कामाचे पैसे मिळतात.'
कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि बॉसच्या उत्तरामुळे संतापलेल्या एबीने हे प्रकरण न्यायालयात नेलं. या नोकरीमुळे महिलेच्या बाळाला नुकसान पोहोचण्याचा धोका असल्याचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. तिच्या कामगिरीच्या जोरावर महिलेला 4 महिन्यांत प्रमोशन मिळालं होतं; पण गर्भवती असल्याने तिच्याशी भेदभाव केला जाऊ लागला. शिवाय तिचा पगारही कमी करून तिला डिमोट करण्यात आलं. हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर न्यायालयाने कंपनीला एबीला 38 लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्यास सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.