तयारी संयुक्त सेवा परीक्षेची
By admin | Published: June 11, 2017 01:56 AM2017-06-11T01:56:34+5:302017-06-11T01:56:34+5:30
भारतीय सैन्यदलात बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी हुकल्यास निराश होण्याची गरज नाही. सैन्यात अधिकारी होण्याची आणखी एक संधी पदवीनंतर संयुक्त सेवा परीक्षा
- प्रा. राजेंद्र चिंचोले
भारतीय सैन्यदलात बारावीनंतर अधिकारी होण्याची संधी हुकल्यास निराश होण्याची गरज नाही. सैन्यात अधिकारी होण्याची आणखी एक संधी पदवीनंतर संयुक्त सेवा परीक्षा (CDS) मार्फत उपलब्ध होते. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC मार्फत CDS ही परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी व आॅक्टोबर/नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते. या वर्षीची CDS-I ही परीक्षा ५ फेबु्रवारी रोजी झाली. तर CDS-Il ही परीक्षा १९ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पुरुष व महिला देऊ शकतात. महिलांना लष्करात अधिकारी होण्याची संधी CDS मार्फतच उपलब्ध होते. यासाठी अर्ज आॅनलाइन पद्धतीने www.upscconline.nic.in या संकेतस्थळावरून भरावा लागेल.
भूदल, नौदल, हवाई दलात अधिकारी पदांवर नियुक्तीसाठी संयुक्त सेवा परीक्षेत निवड होणे गरजेचे असते. भारतीय लष्करी प्रबोधिनी, अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी, नौदल प्रबोधिनी, हवाई दल प्रबोधिनी आदींचा प्राधान्यक्रम द्यावा लागतो. CDS परीक्षेसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे - १) इंडियन मिलिटरी अकादमी (भारतीय लष्करी प्रबोधिनी)साठी १९ ते २४ वर्षे, २) नौदल अकादमी (नौदल प्रबोधिनी)साठी १९ ते २२ वर्षे, ३) हवाई दल प्रबोधिनीसाठी १९ ते २३ वर्षे, ४) आॅफिसर्स ट्रेनिंग अकादमी (अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी)साठी १९ ते २५ वर्षे अशा प्रकारे आहे. CDS परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता ही सेवानिहाय वेगळी असून, भारतीय लष्करी प्रबोधिनीसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, नौदल प्रबोधिनीसाठी व हवाई दल प्रबोधिनीसाठी भौतिकशास्त्र, गणित विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी असणे आवश्यक असते. उमेदवार शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त, निरोगी ठरविताना किमान उंची १५७.५ सेंमी, हवाई दलासाठी १६२.५ सेंमी तर महिला उमेदवारांसाठी १५२ सेंमी निश्चित करण्यात आली आहे.
लेखी परीक्षा, व्यक्तिमत्त्व चाचणी - मुलाखत व वैद्यकीय चाचणी या टप्प्यांतून उमेदवारांची निवड करण्यात येते. लेखी परीक्षेत लष्करी प्रबोधिनी, नौदल प्रबोधिनी व हवाई दल प्रबोधिनीसाठी इंग्रजी, सामान्यज्ञान व गणित या तीन विषयांत तीन पेपर प्रत्येकी १०० गुणांचे व प्रत्येकी २ तासांचे असतात. इंग्रजी विषयासाठी १२० प्रश्न, गणितासाठी १०० प्रश्न व सामान्य ज्ञानासाठी १२० प्रश्न असतात. एकूण परीक्षा ३०० गुणांची असते. अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीसाठी इंग्रजी व गणित हे दोन विषय प्रत्येकी १०० गुणांचे व प्रत्येकी २ तासांचे असतात. चुकीच्या उत्तरांचे गुण निगेटिव्ह मार्किं ग पद्धतीप्रमाणे वजा केले जातात. या परीक्षेसाठी महाराष्ट्रात मुंबई व नागपूर ही दोन केंद्रे आहेत. सामान्यज्ञानाच्या अभ्यासासाठी NCERT ची पुस्तके, चालू घडामोडींसाठी नियमितपणे वर्तमानपत्रे वाचन उपयुक्त ठरते. इंग्रजीसाठी शब्दसाठा वाढवून व्याकरणाचा बारकाईने अभ्यास करावा. गणितासाठी भरपूर सराव गरजेचा आहे.
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाद्वारे मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीत उमेदवारांची नेतृत्वगुण चाचणी, वक्तृत्वगुण, जिज्ञासू वृत्ती, निर्णय क्षमता, आकलन क्षमता, शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, मानसिक क्षमता तपासणाऱ्या चाचण्या घेतल्या जातात.
भारतीय लष्करी प्रबोधिनीच्या मुलाखतीस २०० गुण असतात. निवड झालेल्या उमेदवारांना इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, नौदल अकादमी एझिम, एअर फोर्स अकादमी हैदराबाद, पुरुषांसाठी व महिलांसाठी आॅफिसर्स ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथे प्रशिक्षण दिले जाते.
IMA चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर लष्करात लेफ्टनंटपदी निवड होते. लेफ्टनंटनंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडियर या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत. हवाई दलाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची फ्लाइंग आॅफिसर म्हणून नियुक्ती होते. फ्लाइंग आॅफिसरनंतर फ्लाइंग लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर, विंग कमांडर या पदोन्नतीच्या संधी उपलब्ध आहेत. नौदलाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सब लेफ्टनंट पदावर निवड होते. सब लेफ्टनंटनंतर लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर, कॅप्टन या पदोन्नतीच्या संधी आहेत.
सीडीएस परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राद्वारे तयारी करून घेतली जाते. सीडीएस परीक्षेचे योग्य मार्गदर्शन महाराष्ट्रीय उमेदवारांना मिळावे या उद्देशाने या मार्गदर्शन केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. या केंद्राद्वारे महाराष्ट्रातील उमेदवारांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते, यासाठी एक प्रवेश परीक्षा घेतली जाते.
CDS परीक्षेच्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रात काम करण्याची व देशसेवेची संधी मिळते. देशाच्या संरक्षणाची जबाबदारी हे एक उदात्त व राष्ट्रसेवेचे कार्य आहे. सैनिकी सेवेबद्दल जनतेला प्रचंड आदर आहे. उऊर परीक्षेच्या माध्यमातून सन्मान, सामाजिक प्रतिष्ठा यासोबत चांगला पगार व पदोन्नतीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. यासाठी या परीक्षेची गांभीर्याने तयारी करणे आवश्यक आहे.