कुत्र्यांसाठी खासगी जेट; वर्षभराचं वेटिंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:33 AM2022-02-01T05:33:09+5:302022-02-01T05:33:45+5:30

Jara Hatke News: हाँगकाँगमधला एक वाक्प्रचार आता जगभरातील लोकांसाठी जणू ‘डायलॉग’ झाला आहे. हा डायलॉग आहे.. ‘प्रायव्हेट जेट फॉर युवर पेट..’ अर्थात हा काही फक्त डायलॉग किंवा तोंडपाटिलकी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हाँगकाँगमधील अनेक नागरिकांनी आपली कुत्री, मांजरं आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी आता खासगी विमान वापरायला सुरुवात केली आहे.

Private jets for dogs; Year-round waiting! | कुत्र्यांसाठी खासगी जेट; वर्षभराचं वेटिंग!

कुत्र्यांसाठी खासगी जेट; वर्षभराचं वेटिंग!

Next

‘मोगँबो खुश हुआ..’, ‘डॉन को पकड़ना मुश्किलही नहीं नामुमकिन है..’ ‘कौन कम्बख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है..’, ‘सलीम तुम्हें मरने नहीं देगा और अनारकली हम तुम्हें जीने नहीं देंगे...’
- आपल्या हिंदी सिनेमांतील हे काही फेमस डायलॉग.. तुम्ही म्हणाल, असे फिल्मी डायलॉग आज तुम्ही का मारताहात? - त्याला कारणही तसंच आहे. कारण हाँगकाँगमधला एक वाक्प्रचार आता जगभरातील लोकांसाठी जणू ‘डायलॉग’ झाला आहे. हा डायलॉग आहे.. ‘प्रायव्हेट जेट फॉर युवर पेट..’ अर्थात हा काही फक्त डायलॉग किंवा तोंडपाटिलकी नाही, ही वस्तुस्थिती आहे. हाँगकाँगमधील अनेक नागरिकांनी आपली कुत्री, मांजरं आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी आता खासगी विमान वापरायला सुरुवात केली आहे. संपूर्ण जगातल्या विमान कंपन्या या काळात डबघाईला आलेल्या असताना हाँगकाँगमधील विमान कंपन्या मात्र केवळ या प्राण्यांमुळे तगून आहेत. 
सर्वसामान्य माणसांपुढे यामुळे एक प्रश्न नक्कीच उभा राहतो आहे, तो म्हणजे हाँगकाँगचे लोक खरंच इतके श्रीमंत आहेत का, की आपल्या पाळीव प्राण्यांसाठीही ते खासगी विमानांचा वापर करताहेत?
कोविडचा काळ हे त्याचं उत्तर आहे. कोरोनामुळे हाँगकाँगमधील व्यापार, उद्योग आणि नोकरीच्या अनेक संधी कमी झाल्या आहेत. शिवाय जगात जे थोडे देश आहेत, जिथे कोरोनाचे नियम सर्वांत कठोर आहेत, त्यातील हाँगकाँग हा एक देश आहे. परदेशी नागरिकांना देशात प्रवेश करण्यासाठी तर हाँगकाँगनं पूर्ण बंदीच घातली आहे. त्याशिवाय त्यांचे जे नागरिक परदेशातून येतील, त्यांनाही तीन आठवड्यांसाठी सक्तीनं क्वारंटाइन व्हावं लागतं आहे. त्यांची तपासणी कितीही वेळा निगेटिव्ह आली, तरीही क्वारंटाइनची सक्ती त्यांच्यावर आहे. जगण्यासाठी, प्रगतीसाठी अधिक चांगल्या संधी जिथे उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी हे लोक स्थलांतर करीत आहेत. काही जण कायमचे तर काही जण परिस्थिती सुधारेपर्यंत. 
हाँगकाँगच्या अनेक लोकांनी लहान-मोठे प्राणी, पक्षी पाळले आहेत. परदेशी स्थलांतर करताना त्यांना आपल्या आवडत्या प्राण्यांना मात्र सोबत घेऊन जाता आलं नाही. कारण कोरोनाच्या भीतीनं हाँगकाँग सरकारनं आणि तिथल्या विमान कंपन्यांनी त्यांना तशी परवानगी दिली नाही. आपल्या पाळीव प्राण्यांना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी या नागरिकांनी आता थेट खासगी विमानांचा वापर सुरू केला आहे. त्यांचं म्हणणं आहे, स्वत: येऊन आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन जाण्यापेक्षा त्यांना विमानानं आपल्याकडे बोलवणं जास्त स्वस्त पडतं. कारण पुन्हा हाँगकाँगला आलं तर सक्तीनं तीन आठवड्यांचं क्वारंटाइन, त्यासाठी महागड्या हॉटेलांसाठी मोजावी लागणारी किंमत ही प्राण्यांना विमानानं घेऊन येण्यापेक्षा कितीतरी जास्त महाग पडते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात श्रीमंत जसे आहेत, तसे सर्वसामान्य लोकही आहेत; कारण आपल्या प्राण्यांशिवाय जगणं त्यांना अशक्य झालं आहे. 
हाँगकाँगस्थित ‘टॉप स्टार्स एअर’ या खासगी विमान वाहतूक कंपनीच्या संस्थापक आणि संचालक ओल्गा रॅडलिंस्का म्हणतात, या काळात श्रीमंत व्यक्ती, उद्योजक यांच्या विमानप्रवासामुळे आमचा जितका व्यवसाय झाला, त्याच्या कितीतरी अधिक पट व्यवसाय कुत्रे आणि इतर प्राण्यांना परदेशात पाठविल्यामुळे झाला आहे. या प्राण्यांनी मात्र आम्हाला अक्षरश: जीवदान आणि नवसंजीवनी दिली आहे. हे प्राणी नसते, तर हाँगकाँगमधली विमान इंडस्ट्री अक्षरश: रसातळाला गेली असती आणि हजारो लोक ‘रस्त्यावर’ आले असते. कुत्रे आणि इतर प्राणी-पक्ष्यांनी विमान कंपन्यांना किती बिझिनेस द्यावा? विमानातून प्राणी पाठविण्याचा आमचा बिझिनेस तब्बल ७०० टक्क्यांनी वाढला आहे! 
अनेक विमान कंपन्यांनी तर प्राणी पाठविण्यासाठी एकतर्फी वाहतूक सुरू केली आहे. आपल्या देशातून प्राणी घेऊन जायचे आणि सध्या ज्या देशात त्यांचे मालक आहेत, त्या देशात त्यांना नेऊन सोडायचं. अर्थातच परदेशातून प्राण्यांना पुन्हा हाँगकाँगला आणायला परवानगी नाही. विमानात बसविण्यापूर्वी या प्राण्यांच्याही अनेक प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. हा आपलाच प्राणी आहे, हे ओळखता यावं यासाठी त्यांच्या शरीरात मायक्रोचिप्सही बसविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्राण्यांच्या वाहतुकीसाठी प्रचंड मोठी रक्कम या कंपन्या आकारतात. आपल्या प्राण्यांचा विमानप्रवास सुखकर आणि स्वस्त व्हावा, यासाठी हाँगकाँगमध्ये अनेक ऑनलाइन क्लब्जही तयार झाले आहेत. एकत्रितपणे या प्राण्यांना त्यांच्या  मालकांकडे पाठवलं जातं. यात कुत्री, मांजरं आहेत; तसंच ससे, कासव, विविध पक्षी, अगदी उंदरांचाही समावेश आहे. 

वर्षभरासाठी वेटिंग लिस्ट!
परदेशप्रवासासाठी हे प्राणी आणि त्यांचे मालक किती उत्सुक असावेत? त्यासाठी प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट आहे. अनेक कुत्री, प्राणी तर वर्षभरापासून ‘रांगेत’ आहेत; पण अजून त्यांचा नंबर लागलेला नाही. खास प्राण्यांसाठी हाँगकाँग ते जपान, ब्रिटन, तैवान, लंडन, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांत जाण्यासाठी विमानांचा हा अनोखा ‘वन वे’ सुरू झाला आहे.

Web Title: Private jets for dogs; Year-round waiting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.