एका कुत्र्याला पकडण्यासाठी चक्क १२ हजारांचं बक्षीस; लोकांमध्ये पसरली मोठी दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 12:56 PM2020-06-09T12:56:31+5:302020-06-09T12:56:54+5:30
हे ऐकताना तुम्हाला अजब-गजब वाटेल, पण पानीपतच्या एका हायप्रोफाईल कॉलनीत ही घटना समोर आली आहे
पानीपत – देशात आणि राज्यात कोरोनामुळे लोकांना बाहेर पडण्यावर मज्जाव घातला होता, २ महिन्यापासून लॉकडाऊन सुरु होते. पानीपतच्या यमुना एंक्लेवमध्ये लोकांना कोरोनासोबतच एका कुत्र्याने घराबाहेर पडण्यावर आव्हान निर्माण केले आहे. भटक्या कुत्र्यांमुळे अनेक जण त्रस्त असतात. पण कधी तुम्ही ऐकलं आहे का? एका कुत्र्याला पकडण्यासाठी रोख रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केली आहे.
हे ऐकताना तुम्हाला अजब-गजब वाटेल, पण पानीपतच्या एका हायप्रोफाईल कॉलनीत ही घटना समोर आली आहे. याठिकाणी यमुना एंक्लेवमध्ये एका कुत्र्याच्या दहशतीनं लोकांचे घराबाहेर पडणे कठीण झालं आहे. मागील २ महिन्यापासून जवळपास १२ जणांना या कुत्र्याने चावा घेतला आहे. सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर पडणाऱ्या लोकांना त्याने निशाणा बनवला आहे. एक्लेंव गार्ड, स्वीपरने याला पकडण्याचे अनेक प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही.
इतकचं नाही तर या कुत्र्याला पकडण्यासाठी एक्लेंव सोसायटीने सोनीपतवरुन टीम बोलावली, या टीमला कुत्र्याला पकडणं कठीण गेले. स्थानिक महापालिकेच्या पथकाने दोनदा या कुत्र्याला पकडण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना यश आलं नाही. त्यामुळे यमुना एंक्लेव रहिवाशांनी या कुत्र्याला पकडणाऱ्याला १२ हजार रुपये रोख रक्कम बक्षीस देण्याचं जाहीर केले आहे.
यमुना एंक्लेव को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सांगितले की, जो व्यक्ती या कुत्र्याला पकडण्यात आणि कॉलनीच्या बाहेर नेण्यात यशस्वी होईल त्याला १२ हजार बक्षीस दिलं जाईल. मागील दीड-दोन महिन्यापासून हा कुत्रा कॉलनीतील लोकांसाठी डोकेदुखी बनला आहे. कुत्र्याच्या दहशतीनं लोकांनी घराबाहेर पडणे मुश्किल झालं आहे. कोरोनामुळे २ महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने लोक घरातच होते, मात्र आता लॉकडाऊन शिथिल झालं असलं तरी कुत्र्याच्या दहशतीनं त्यांना घरातच बसावं लागत आहे.
महापालिकेच्या महापौर अवनीत कौर म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे शहरातील कुत्रे आणि माकड पकडण्याचं अभियान ठप्प झालं होतं. आता लॉकडाऊन उघडल्यामुळे हे अभियान पुन्हा सुरु होईल. लवकरच या सोसायटीमधील त्या भटक्या कुत्र्याला पकडलं जाईल असं आश्वासन महापालिकेने दिले आहे.