जगातले दोन देश सोडून एकाही देशाच्या ध्वजात जांभळा रंग नसतो, कारण काय? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 06:41 PM2021-12-22T18:41:50+5:302021-12-22T18:45:45+5:30

विविध देशांचे ध्वज पाहताना एक गोष्ट कधी तुमच्या लक्षात आली आहे का? वेगवेगळ्या राष्ट्रध्वजांमध्ये नानाविध रंग असतात; पण जांभळा रंग  (Purple Colour)  नसतो. राष्ट्रध्वजाच्या बाबतीत हा रंग अत्यंत दुर्मीळ मानला जातो.

purple color is inside on two countries flags other countries in the world do not have purple color in flag | जगातले दोन देश सोडून एकाही देशाच्या ध्वजात जांभळा रंग नसतो, कारण काय? घ्या जाणून

जगातले दोन देश सोडून एकाही देशाच्या ध्वजात जांभळा रंग नसतो, कारण काय? घ्या जाणून

googlenewsNext

जगभरात अनेक लहान मोठे देश  (Countries)  आहेत. त्यांचे प्रत्येकाचे राष्ट्रध्वज   (National Flags)  ठरलेले आहेत. कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व, अस्तित्व, वेगळेपण, समृद्धीचं आणि अभिमानाचं प्रतीक असतं. राष्ट्रध्वजाची रचना, आकार आणि रंग यामागे प्रत्येक देशाचे काही संकेत असतात. आपल्या तिरंग्यातील हिरवा रंग निसर्गाशी, मातीशी असलेलं नातं दाखवतो. पांढरा रंग सत्य, शांती आणि पावित्र्य दर्शवतो, तर केशरी रंग हा सर्वसंगपरित्याग, साहस आणि बलिदानाचं प्रतीक आहे. मध्यभागी असणारे अशोकचक्र धर्म किंवा सदाचरण तसंच प्रगतिशील चळवळीचं प्रतीक आहे. अशा पद्धतीने प्रत्येक देशाच्या ध्वजातून त्या देशाची अस्मिता ध्वनित होत असते. त्यामुळे जगभरातील अनेक देशांचे वेगवेगळे ध्वज पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.

मात्र असे विविध देशांचे ध्वज पाहताना एक गोष्ट कधी तुमच्या लक्षात आली आहे का? वेगवेगळ्या राष्ट्रध्वजांमध्ये नानाविध रंग असतात; पण जांभळा रंग  (Purple Colour)  नसतो. राष्ट्रध्वजाच्या बाबतीत हा रंग अत्यंत दुर्मीळ मानला जातो. जगात डॉमिनिका  (Domnica)  आणि निकाराग्वा  (Nikargua)  हे दोनच देश असे आहेत ज्यांच्या राष्ट्रध्वजात जांभळा रंग आहे.

वर्ल्ड अ‍ॅटलसच्या (World Atlas) अहवालानुसार, एक काळ असा होता जेव्हा जांभळा रंग हा अतिशय दुर्मीळ (Rare Colour) मानला जात होता. सोन्यापेक्षाही तो महाग होता. कारण त्या काळी जांभळा रंग हा एका विशिष्ट प्रकारच्या सागरी गोगलगायींपासून तयार केला जात असे. या गोगलगायी लेबनॉनमधील समुद्रातच आढळत. एक ग्रॅम जांभळा रंग तयार करण्यासाठी 10 हजारांहून अधिक गोगलगायी माराव्या लागत. त्यामुळे त्याची किंमतही प्रचंड होती. 1 पौंड जांभळा रंग खरेदी करण्यासाठी 41 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येत असे. त्यामुळे राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी जांभळा रंग वापरला जात नसे.

त्याचप्रमाणे 1800 च्या दशकात, जांभळा रंग खरेदी करणे हा श्रीमंतांचा छंद होता. यामुळेच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth) यांनी राजघराण्याव्यतिरिक्त कोणालाही जांभळ्या रंगाचे कपडे वापरण्याची परवानगी नसल्याची घोषणा केली होती. त्यामुळेही जांभळा रंग सर्वसामान्यांपासून दूर होता. असा हा दुर्मीळ जांभळा रंग सर्वसामान्यांच्या आयुष्यात आला तो विल्यम हेन्री पर्किन यांच्यामुळे. 1856 मध्ये, विल्यम हेन्री यांनी कृत्रिमरित्या जांभळा रंग तयार करण्यात यश मिळवलं, त्यामुळे या रंगाची किंमत आणि दुर्लभता कमी झाली आणि हळूहळू जांभळा रंग सर्वसामान्यांच्या आयुष्यातही रंग भरू लागला.

त्यानंतर डॉमिनिका या देशाने १९७८ मध्ये आपला राष्ट्रध्वज तयार केला तेव्हा त्यात जांभळ्या रंगाचा वापर केला तर १९०८ मध्ये निकाराग्वा या देशाने आपल्या राष्ट्रध्वजात हा रंग समाविष्ट केला. त्यामुळे आज जगातील १९५ देशांपैकी डॉमिनिका आणि निकाराग्वा या दोनच देशांच्या राष्ट्रध्वजात जांभळा रंग आहे.

Web Title: purple color is inside on two countries flags other countries in the world do not have purple color in flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.