जगातील सर्वात उंच चिनाब पूल, रेल्वेने शेअर केले अप्रतिम फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:25 PM2022-09-15T12:25:13+5:302022-09-15T12:27:09+5:30
Chenab Bridge : हा पूल 1.315 किलोमीटर लांब असून त्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे.
भारतात जगातील सर्वात उंच कमान असलेल्या चिनाब पुलाचे (Chenab Bridge) बांधकाम पूर्ण झाले असून, आता त्यावर रेल्वे रुळ टाकण्याचे काम बाकी आहे. 2022 च्या अखेरीस या पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हा पूल सिव्हिल इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे, ज्याद्वारे श्रीनगरला उर्वरित भारताशी जोडले जाईल.
भारतीय रेल्वेने ट्विटरवर चिनाब पुलाचे काही फोटो शेअर केले आहेत, ते पाहून सर्वजण आश्चर्यचकित होत आहेत. चिनाब ब्रिज या पुलाचे बांधकाम कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) आणि उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे. 14 ऑगस्ट 2022 रोजी, रियासी जिल्ह्यातील कौरी भागात चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या वरच्या डेकचे काम पूर्ण झाले.
हा पूल 1.315 किलोमीटर लांब असून त्याची उंची 359 मीटर आहे. चिनाब ब्रिज आयफेल टॉवरपेक्षा उंच आहे. भारतात बांधला जात असलेला हा पूल जगातील सर्वात उंच आर्क पूल आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सलाल-ए आणि दुग्गा रेल्वे स्थानकांना रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीशी जोडेल. रेल्वेने पुलाचे काही अतिशय प्रेक्षणीय असे फोटो प्रसिद्ध केले आहेत.
A sight of the breathtakingly beautiful Chenab Bridge. pic.twitter.com/qpmaUlApCt
— Ministry of Railways (@RailMinIndia) September 13, 2022
आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच
कटरा-बनिहाल रेल्वे सेक्शनवर उत्तर रेल्वेकडून चिनाब पूल बांधला जात आहे, ज्याची अंदाजे किंमत 27949 कोटी रुपये आहे. चिनाब पूल उधमपूर-कटरा-कांजीगुंडला जम्मूशी जोडेल. चिनाब पूल नदी पातळीपासून 359 मीटर उंच आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल होण्याचा मान या पूलाला मिळणार आहे. हा पूल फ्रान्समधील आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे.
'टेकला' सॉफ्टवेअरचा वापर
या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाच्या कमानीचे काम एप्रिल 2021 मध्येच पूर्ण झाले. या कमानीचे एकूण वजन 10619 मेट्रिक टन असून त्याचे भाग भारतीय रेल्वेने प्रथमच केबल क्रेनद्वारे उभारले आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या स्ट्रक्चरल डिटेलिंगसाठी 'टेकला' सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये वापरलेले स्ट्रक्चरल स्टील मायनस 10 डिग्री सेल्सिअस ते 40 डिग्री सेल्सिअस तापमानाला तोंड देऊ शकते.