अजबच की! मोबाईलवर मैत्री, पहिल्याच भेटीत लग्न अन् १७ दिवसांत घडला भलताच प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 04:06 PM2021-07-29T16:06:53+5:302021-07-29T16:09:31+5:30
पहिल्यांदा भेटले अन् लग्न केलं; त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं
जोधपूर: राजस्थानाच्या जालौर जिल्ह्यात एक अजबर प्रकार घडला आहे. एका तरुण-तरुणीची मोबाईलवरून मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर अवघ्या काही दिवसांत प्रेमात झालं. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत प्रेमी युगुलानं विवाह केला. लग्नानंतर काही दिवसांतच तरुणी माहेरी गेली. तरुणानं न्यायालयात याचिका दाखल केली.
तरुणीला तिच्या कुटुंबापासून सोडवण्यात यावं अशी मागणी तरुणानं न्यायालयानं केली. त्यानंतर न्यायालयात तरुणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. त्यात तरुणीनं कुटुंबासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयानं तिला आई वडिलांसोबत राहण्यास परवानगी दिली. विशेष म्हणजे हा सगळा घटनाक्रम अवघ्या १७ दिवसांत घडला.
जालोरच्या सायला परिसरात वास्तव्यास असलेल्या जीतराम मालीनं उच्च न्यायालयात त्याच्या पत्नीला माहेरच्यांनी सोडावं यासाठी याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयानं तरुणाच्या पत्नीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं. न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती मनोज कुमार यांच्या खंडपीठासमोर पोलिसांनी तरुणीला हजर केलं. त्यावेळी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा तरुणीनं व्यक्त केली.
'आमची ओळख मोबाईलवर झाली. त्यानंतर मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. पहिल्याच भेटीत आम्ही लग्न केलं. मात्र आमचं पटणार नाही याची कल्पना मला काही दिवसांतच आली. त्यामुळे मी आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला,' असं तरुणीनं न्यायालयाला सांगितलं. त्यानंतर न्यायालयानं तरुणीला आई वडिलांसोबत राहण्याची परवानगी दिली.