इंजिनातील बिघाडानंतर चालकाविना १५ किमीपर्यंत धावली राजधानी एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2016 05:23 AM2016-06-30T05:23:37+5:302016-06-30T12:33:08+5:30
मडगाव- निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा अपघात सोमवारी थोडक्यात टळला.
नवी दिल्ली : मडगाव- निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसचा अपघात सोमवारी थोडक्यात टळला. रेल्वे इंजिनात बिघाड झाल्यानंतर ती उतारावर चालकाविना १५ कि.मी. अंतर धावल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
सोमवारी संध्याकाळी ५.५० वाजता रत्नागिरी स्थानकाजवळ एका लांब बोगद्यात इंजिनातील बिघाडामुळे ती थांबली होती. तांत्रिक कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्याचा प्रयत्न चालविला असतानाच उतार असल्यामुळे ती धावायला लागली. त्यावेळी चालक गार्डच्या केबिनमध्ये होता. वेग कमी होताच त्याने इंजिनच्या केबिनमध्ये उडी घेत प्रवेश मिळविला अशी माहिती सूत्रांनी दिली असली तरी रेल्वेने त्याला दुजोरा दिलेला नाही. ही रेल्वे चालकाविना धावल्याची कबुली रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. मात्र कोकण रेल्वेचे सीएमडी संजय गुप्ता यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा
केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>उच्चस्तरीय चौकशीचा आदेश...
या रेल्वेच्या इंजिनात बिघाड झाला होता हे खरे आहे. ती काही वेळ समोर सरकलीही. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचा आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
इंजिनचे व्हॅक्यूम ब्रेक निकामी झाल्यामुळे उताराच्या दिशेने ती धावली. ती चढावावर आल्यानंतर चालकाने ब्रेक लावून ती थांबविली. शेवटी दुसरे इंजिन बोलावून ती जवळचे स्थानक असलेल्या चिपळूणपर्यंत नेण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. सुदैवाने मोठ्या अपघातातून बचावल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली आहे.