दुर्मीळ! फोटोग्राफरला दिसला पिवळा पेंग्विन; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'लय भारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:59 PM2021-02-20T13:59:58+5:302021-02-20T14:04:09+5:30
Rare yellow penguin spotted by photographer: पिवळे पेंग्विन पाहून फोटोग्राफर भारावला; दक्षिण जॉर्जियातील बेटाजवळ दुर्मीळ पेंग्विनचं दर्शन
निसर्ग म्हणजे सर्वात मोठा जादूगार. तुम्ही निसर्गाच्या जितक्या जवळ जाल, तितका निसर्ग त्याच्या पोतडीतल्या एकापेक्षा एक सुंदर गोष्टी दाखवतो. निसर्गात नेमकं काय काय दडलंय, ते निसर्गाच्या कुशीत शिरल्याशिवाय समजत नाही. निसर्गाच्या जवळ गेल्यावर निसर्गाची अद्भुत किमया पाहायला मिळते. याचा अनुभव एका फोटोग्राफरनं घेतला आहे. निसर्गाचा चमत्कार पाहून फोटोग्राफर अक्षरश: भारावून गेला. त्यानं त्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Rare yellow penguin spotted by photographer)
काळ्या-पांढऱ्या रंगांचे पेंग्विन तुम्ही अनेकदा पाहिले असतील. समुद्र किनारी फिरणारे शेकडो पेंग्विन म्हणजे जणू एकाच गणवेशातले विद्यार्थी दिसतात. पण तुम्ही कधी पिवळ्या रंगाचा पेंग्विन पाहिला आहे का? वाईल्ड लाईफ फोटोग्राफर इव्ह ऍडम यांनी दक्षिण जॉर्जियात २०१९ मध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पेंग्विनचा फोटो टिपला आहे. शुक्रवारी इन्स्टाग्रामवरून त्यांनी पिवळ्या पेंग्विनचा दुर्मीळ फोटो शेअर केला आहे.
'मला सुंदर किंग पेंग्विन पाहण्याची संधी मिळाली. त्या पेंग्विनचे फोटो मला टिपता आले. मला जणू काही निसर्गाची लॉटरी लागली,' अशा शब्दांत ऍडम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'दक्षिण जॉर्जियात असलेल्या बेटाजवळील दुर्गम समुद्र किनाऱ्यावर आम्ही आमच्या रबर बोटी उघडत होतो. त्यावेळी किंग पेंग्विन आमच्या समोर आला. आसपास समुद्री हत्ती, अंटार्टिक सील यांची गर्दी असताना तो पेंग्विन आमच्या दिशेनं चालू लागला. माझ्यासारखा भाग्यवान मीच असं त्यावेळी मला वाटलं,' असं ऍडम यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.