नरभक्षक उंदरांनी या देशात घातले थैमान, कुरतडताहेत लोकांचे डोळे आणि कान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 08:53 AM2021-06-15T08:53:44+5:302021-06-15T08:55:01+5:30
International News: एकीकडे जग कोरोना विषाणूच्या थैमानामुळे त्रस्त असताना दुसरीकडे या देशातील लोक मात्र वेगळ्याच समस्येने त्रस्त आहेत.
मेलबर्न - एकीकडे जग कोरोना विषाणूच्या थैमानामुळे त्रस्त असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियन लोक मात्र वेगळ्याच समस्येने त्रस्त आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सध्या नरभक्षी उंदरांनी प्रचंड थैमान घातले आहे. येथील जवळपास प्रत्येक घरात उंदरांनी उच्छाद घातला असून, हे उंदीर आता माणसांवरही हल्ले करत असल्याचे वृत्त आहे. (rats have invaded in Australia, biting people's eyes and ears)
हल्लीच ऑस्ट्रेलियामध्ये एका शेतकऱ्याच्या पत्नीवर उंदरांनी हल्ला केला. या महिलेचे डोळे उंदरांनी कुरतडले. या महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही महिला अचानक झोपेतून उठली असता उंदीर डोळे कुरतडत असल्याचे तिला दिसून आले. त्यानंतर या महिलेच्या पतीने तिला रुग्णालयात दाखल केले.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या ३० वर्षांतील उंदरांचा हा सर्वात भयंकर प्रकोप आहे. आतापर्यंत अनेक जणांवर उंदरांनी हल्ला केला आहे. हल्लीच सिडनीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीचा कान उंदरांनी चावला होता. त्याने सांगितले की, झोपेत असताना माझी त्वचा कुणीतरी कुरतडत असल्याचे मला जाणवले. लाईट सुरू करून पाहिले असता मी पाहिले की, एक उंदीर माझा कान चावत होता.
ऑस्ट्रेलियामध्ये अशाप्रकारे उच्छाद मांडून ठेवला आहे. काही घरांमध्ये उंदीर आगीसारख्या घटनांना कारणीभूत ठरत आहेत. शेतकऱ्यांना उंदरांमुळे सर्वात जास्त त्रास होत आहे. उंदीर धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. असे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत ज्यामध्ये शेकडो उंदीर दिसत आहेत. अनेक लोकांनी उंदरांनी हल्ला केल्याचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका महिलेने सांगितले की, ती दररोज सुमारे ५० उंदरांना मारून फेकत आहे. तर एका महिलेने लिहिले की, उंदरांमुळे तिची नवी कार नुकसानग्रस्त झाली आहे.