आज सोनं खरेदी करण्याआधी या टीप्स नक्की वाचा.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 12:33 PM2017-10-17T12:33:20+5:302017-10-17T13:10:37+5:30
पूर्वीच्या सोन्यामध्ये जी झळाळी आणि लकाकी असायची ती आताच्या सोन्यामध्ये अजिबात दिसत नाही. कारण...
सोने खरेदीचा आज सर्वात महत्वाचा दिवस. आज लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्याला आपल्या संस्कृतीत धन, संपत्तीचा दर्जा आहे. त्यामुळे या सोन्याचीही आपण कित्येकदा पूजा करतो. पण गेल्या काही दिवसात सोन्यामध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. पूर्वीच्या सोन्यामध्ये जी झळाळी आणि लकाकी असायची ती आताच्या सोन्यामध्ये अजिबात दिसत नाही. वर्षभर साठवलेल्या जमा-पूंजीतून आपण सोने खरेदी करतो पण यामध्ये जर भेसळ होत असेल तर ती आपली शुद्ध फसवणूक असते. त्यामुळे सोने खरेदी करताना नेहमीच सावधानता बाळगा. सोने खरेदी करताना काय ध्यानात ठेवाल याची संक्षिप्त माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.
शुद्ध सोनं म्हणजे २४ कॅरेटचंच. पण आजकाल २२ कॅरेटचंच सोनं जास्त विकलं जातं. तुम्हाला प्रश्नही पडला असेल की या दोन्हींमध्ये फरक काय. तर फरक असा असतो की, २४ कॅरेट आणि २२ कॅरेट यामध्ये सोन्याचे प्रामाण विभिन्न असतं. २४ कॅरेटमध्ये सोन्याचे प्रमाण ९९.९ टक्के असतं, म्हणजे यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसते, तर २२ कॅरेटमध्ये ९१.६६ टक्के सोनं असतं. २४ कॅरेटचे दागिने अत्यंत मऊ असतात. २४ कॅरेट आणि २२ कॅरेटमध्ये गफलत होऊ नये म्हणून दागिन्यांच्या हॉलमार्कवर सोन्याच्या शुद्धतेची टक्केवारी दिली जाते. ही शुद्धता तपासण्यासाठी गणिताचा आधार घेतला जातो. समजा आपण २२ कॅरेटची शुद्धता तपासत आहोत, तर २२ ला २४ ने भागून त्याला १०० ने गुणावे, त्यातून जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजे त्या सोन्याची शुद्धता.
आता अस्सल सोनं कसं ओळखायचं ते पाहू.
अॅसिड टेस्ट - पिनाच्या सहाय्याने सोन्यावर ओरखडा ओढा. ओरखडा ओढल्यानंतर त्यावर अॅसिडचा थेंब टाका. थेंब टाकल्यावर जर दागिना हिरवा झाला तर समजून जा की तो दागिना बनावट आहे. कारण सोन्यावर कोणत्याही धातूचा परिणाम होत नसतो.
चुंबकाचा वापर करा - लोखंड चुंबकाला आकर्षित होतं. मात्र सोनं होत नाही. त्यामुळे सोन्याला चुंबकाच्या संपर्कात आणल्यानंतर जर सोनं चुंबकाला आकर्षिले गेले तर सोन्यात भेसळ हे असं समजावं.
पाण्याचा वापर करा - सोनं पाण्यात कधीच तरंगत नाही. त्यामुळे एका कपात पाणी घेऊन त्यात सोनं टाका. जर ते एका तळाशी राहिलं तर ते शुद्ध सोनं अाणि जर तरंगु लागलं तर ते बनावट सोनं असल्याचं निप्षन्न होतं.
हॉलमार्कचं चिन्ह पहा - सोन्याच्या शुद्धीकरणासाठी हॉलमार्कचे चिन्ह पाहणं गरजेचं आहे. एजंसी ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ही तपासणी करते. कोणत्याही प्रकारच्या दागिन्यांची विक्री करण्यापूर्वी या एजंसीकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असतं. त्यानंतर त्यावर हॉलमार्क दिला जातो. मात्र काही विक्रेत हॉलमार्कचे खोटे चिन्हही वापरतात. त्यामुळे हॉलमार्क खरा आहे की नाही तेही तपासून घेणे गरजेचं आहे. खऱ्या हॉलमार्कवर भारतीय मानक ब्यूरोचे त्रिकोणी चिन्ह असतं. त्यात हॉलमार्किंग सेंटरसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. त्यात ज्वेलरी तयार केल्याचे वर्ष आणि उत्पादकतेचा लोगो असतो.