भारतात ३ ब्लेड आणि अमेरिकेत ४ ब्लेडचे फॅन का वापरतात?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 12:27 PM2019-02-12T12:27:24+5:302019-02-12T12:32:35+5:30
फॅन आजकाल प्रत्येक घरात वापरला जातो. मुंबईसारख्या शहरात तर फॅनशिवाय रहावलं जात नाही.
फॅन आजकाल प्रत्येक घरात वापरला जातो. मुंबईसारख्या शहरात तर फॅनशिवाय रहावलं जात नाही. केवळ भारतातच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फॅनचा वापर केला जातो. तुम्ही जर पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की, भारतातील सिलिंग फॅनला तीन पाते म्हणजेच ब्लेड असतात. पण ही फॅनच्या ब्लेडची संख्या कमी जास्त होत असते.
भारतात जास्तीत जास्त घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, तीन ब्लेड असलेल्या फॅनचा वापर केला जातो. पण भारताबाहेर चार ब्लेड असलेल्या फॅनचा वापर केला जातो. पण हे असं का याची माहिती तुम्हाला नसेल.
अमेरिका आणि रशियासारख्या थंड देशांतील घरांमध्ये चार ब्लेड असलेल्या फॅन्सचा वापर करता. या देशातील लोकांकडे एसी सुद्धा असतात. त्यामुळे ते या चार ब्लेड असलेल्या फॅनचा वापर एसीच्या मदतीसाठी करतात. म्हणजे एसीचा गारवा पूर्ण रूममध्ये पसरावा यासाठी ते फॅनचा वापर करतात.
भारतात फॅनचा वापर थंड हवेसाठी केला जातो. उकाड्याच्या दिवसात फॅनशिवाय राहणं अशक्य होतं. तीन ब्लेड असलेले फॅन हे चार ब्लेड असलेल्या फॅनपेक्षा हलके असतात आणि अधिक वेगाने फिरतात. त्यामुळे भारतात ३ ब्लेड असलेले फॅन वापरले जातात.
तसेच चार ब्ले़ड असलेल्या फॅनच्या तुलनेत तीन ब्लेड असलेल्या फॅनमुळे वीजेची अधिक बचत होते. लहान रूमसाठीही छोटे ब्लेड असलेले फॅन फायदेशीर ठरतात. या रूमच्या चारही कोपऱ्यांमध्ये हवा पोहोचते. तसेच तीन ब्लेड असणाऱ्या फॅनची किंमतही कमी असते.