"मीच खरा मोगली", व्यक्तीचा अजब दावा; 8 व्या वर्षी बेपत्ता, प्राण्यांसोबत जीवन जगला अन् आता...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:46 PM2024-01-11T13:46:38+5:302024-01-11T13:55:03+5:30
वयाच्या आठव्या वर्षी बेपत्ता झाल्यानंतर तो जंगलात प्राण्यांसोबत राहत होता.
एका व्यक्तीने तो खऱ्या आयुष्यात मोगली असल्याचा दावा केला आहे. वयाच्या आठव्या वर्षी बेपत्ता झाल्यानंतर तो जंगलात प्राण्यांसोबत राहत होता. एल्सिओ अल्वेस डो नॅसिमेंटो असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, 1978 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी त्याचं त्याच्या भावासोबत खेळण्यावरून भांडण झालं होतं. त्यानंतर तो घरातून निघून गेला.
ब्राझीलचा रहिवासी असलेल्या एल्सिओने तो जंगली प्राण्यांमध्ये कसा राहतो हे सांगितलं. भावासोबत झालेल्या भांडणानंतर काय झालं याचं वर्णन करताना तो म्हणतो, माझे वडील खूप कडक होते, त्यांनी मला काठीने मारलं आणि मग मी नदीत पडेपर्यंत पळत राहिलो. मी पोहत किनाऱ्यावर पोहोचलो, पण तोपर्यंत मी हरवलो होतो. आता एल्सिओ 53 वर्षांचा आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, त्याने सांगितलं की, तो घरी पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. एक रात्र जंगलात घालवली. नुसतं चालत राहिलो पण जंगलातून बाहेर पडू शकलो नाही. पावसाळ्यात तो एका गुहेत झोपायचा आणि फळं, नारळ आणि इतर गोष्टी खायचा. अनेक वेळा त्याच्यावर प्राण्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण गुहा आणि झाडांवर चढून त्याने स्वतःला वाचवले.
मला समजले की येथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नाही. मी जमिनीवर झोपलो नाही. नेहमी झाडावर झोपायचो असं त्याने सांगितलं. एल्सिओ उत्तर-पूर्व ब्राझीलमधील बाहिया राज्यातील बॅक्सियो गावात लाइफगार्ड म्हणून काम करतो. वयाच्या 11 व्या वर्षी एका शेतकऱ्याने त्याला जंगलात पाहिलं. त्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. पण जंगलात घालवलेल्या 3 वर्षांचा त्याच्या आयुष्यावर खूप परिणाम झाला आहे.
जंगलात राहिल्यामुळे आवाज कर्कश झाला आहे. बाहेर कसं खायचं हे शिकायला त्याला वेळ लागला. आजारी पडल्यानंतर रुग्णालयात जावं लागलं. जंगलात प्राण्यांसारखं जगणं सोपं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्या नातेवाईकांना वाटलं की मी मेलो आहे. त्यांनी मला शोधणं बंद केलं होतं. माणसांसारखं जगायला शिकल्यानंतर एल्सिओ स्वयंपाक करायला शिकला. त्यानंतर त्याने लग्नही केलं आहे.