बाजारात जायचं असो वा जिम सगळीकडेच लग्नाचा ड्रेस घालून जाते 'ही' महिला, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:24 PM2019-10-02T12:24:58+5:302019-10-02T12:30:37+5:30
प्रत्येकालाच लग्न नेहमी लक्षात राहील असंच करायचं असतं. भारतात तर लग्नावर भरभरून खर्च केला जातो. भारतीय लग्नात सर्वात जास्त खर्च हा नवरी-नवरदेवाच्या लग्नातील कपड्यांवर होतो.
प्रत्येकालाच लग्न नेहमी लक्षात राहील असंच करायचं असतं. भारतात तर लग्नावर भरभरून खर्च केला जातो. भारतीय लग्नात सर्वात जास्त खर्च हा नवरी-नवरदेवाच्या लग्नातील कपड्यांवर होतो. हे त्यांना माहीत असतं की, ते लग्नात घातलेले कपडे पुन्हा कधीही घालणार नाही तरिही. पण टॅमी हॉल याबाबत वेगळा विचार करते. ती तिच्या लग्नातील ड्रेसचा पूर्ण पैसा वसूल करत आहे. ती सुपरमार्केटपासून ते जिमपर्यंत सगळीकडे तिचा वेडिंग ड्रेस घालून जाते. तेही दिमाखात.
ती असं का करतीये?
दक्षिण ऑस्ट्रेलियात राहणारी टॅमी ४३ वर्षांची आहे. तिने गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑर्केस्ट्रा मॅनेजर कॅरन फ्रॉस्टसोबत समलैंगिक विवाह केला. टॅमीने तिच्या लग्नासाठी ९८५ पाउंडचा व्हाइट ड्रेस खरेदी केला होता. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ८६००० रूपये इतकी होते. 'द सन' सोबत बोलताना टॅमी सांगते की, 'एका ड्रेसवर इतका खर्च केल्यानंतर हा ड्रेस एकदाच घालणं, हे जरा अजब आहे. मी तर त्या कपड्यांवर खर्च केलेल्या किंमतीवर न्याय करत आहे'.
टॅमी सांगते की, 'मला हे माहीत आहे की, मी जेव्हा हा ड्रेस घालून बाहेर पडते, तेव्हा लोक मला कसे बघतात. पण मी माझ्या मनाचं ऐकते. मी भारतात फिरायला गेली होती. त्यानंतर मला जाणवलं की, आपण एक समाजाच्या रूपात किती उपभोग करतो. नंतर मी स्वत:शीच ठरवलं की, मी एक वर्ष कपडे किंवा शूज घेणार नाही'.
टॅमीसाठी स्वत:सोबत केलेलं प्रॉमिस निभावणं सोपं होतं. पण यादरम्यान तिचं लग्न ठरलं. ती तिचं प्रॉमिस तोडणार होती. पण तिने विचार केला की, इतके पैसे खर्च करूनही ती केवळ काही तासांसाठीच हा ड्रेस घालणार. ही बाब तिला आवडली नाही. टॅमीने तेव्हाच ठरवलं की, ती हा ड्रेस लग्नात एकदाच नाही तर त्यानंतर पुन्हा पुन्हा वापरेल. आता ती तेच करत आहे.